Nitin Gadkari: केंद्रीयमंत्री नितीन गडकरी देणार ५०० रुपये कमावण्याची संधी?

0

नवी दिल्ली,दि.१७: केंद्रीय वाहतूक मंत्री नितीन गडकरी (Nitin Gadkari) ५०० रुपये कमावण्याची संधी देणार आहेत. यासाठी ते नवीन कायदा आणण्याच्या तयारीत आहेत. नितीन गडकरी यांनी चुकीच्या पद्धतीने पार्किंग केलेल्या वाहनाचा फोटो काढून पाठवणाऱ्याला ५०० रुपये देण्यासंबंधी नवा कायदा आणण्याचा विचार करत असल्याचं म्हटलं आहे. दिल्लीमध्ये आयोजित इंडस्ट्रियल डेकार्बोनायझेशन समिटमध्ये ते बोलत होते. यावेळी बोलताना त्यांनी पार्किंग ही फार मोठी समस्या असल्याचं सांगितलं. दरम्यान नितीन गडकरी यांनी केलेलं हे वक्तव्य उपहासात्मकपणे होतं की खरंच गांभीर्याने विचार सुरु आहे याबाबत स्पष्टता होऊ शकली नाही.

नितीन गडकरी म्हणाले

“प्रत्येक व्यक्ती गाडी घेत आहे. माझ्या नागपुरातील घऱी स्वयंपाक करणाऱ्याकडेही दोन गाड्या आहेत. याआधी अमेरिकेत सफाई करणारी महिला गाडीतून यायची तेव्हा आपण आश्चर्याने पाहायचो. पण आता आपल्याकडेही तेच होत आहे. कुटुंबात चार माणसं आणि सहा गाड्या असतात. दिल्लीवाले तर नशिबवान आहेत, कारण आम्ही रस्ते त्यांच्या पार्किगसाठी तयार केले आहेत. कोणीही पार्किंग तयार करत नाही, सगळे रस्त्यावर गाडी उभी करतात,” अशी खंत यावेळी गडकरींनी बोलून दाखवली.

पुढे बोलताना ते म्हणाले की, “मी एक कायदा आणणार आहे. रस्त्यावर जो गाडी उभी करणार त्याचा मोबाइलवरुन फोटो काढून पाठवल्यास दंडातील १००० रुपयांपैकी ५०० रुपये त्याला दिले जातील”. यानंतर उपस्थितांमध्ये एकच हशा पिकला.

मोठं घर बांधल्यानंतर खाली पार्किंगसाठीही जागा बनवा असा सल्ला यावेळी गडकरींनी दिला. माझ्या नागपुरातील घरी १२ गाड्यांसाठी अंडरग्राऊंड पार्किंग आहे. मी रस्त्यावर गाडी उभी करत नाही अशी माहिती यावेळी गडकरींनी दिली.

नितीन गडकरी यांनी आपल्या युट्यूब अकाऊंटवर व्हिडीओ शेअर केला आहे. यावेळी त्यांनी सार्वजनिक वाहतुकीमध्ये इलेक्ट्रिक वाहनांचा वापर गरजेचा असल्याचं सांगितलं.


LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here