भाजपा मनसे युती होणार? भाजपा प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे राज ठाकरे यांची भेट घेणार

0

मुंबई,दि.30: भाजपा मनसे युती होण्याची शक्यता आहे. मनसे अध्यक्ष राज ठाकरे (Raj Thackeray) यांनी महाविकास आघाडीचे सरकार असताना भोंग्याविरुद्ध आंदोलन केले होते. मनसेच्या आंदोलनाला भाजपाने पाठिंबा दिला होता. तेव्हापासून भाजपा मनसे युती होण्याची शक्यता वर्तवण्यात येत होती. आता परत राज्यातील येऊ घातलेल्या महापालिका आणि स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर भाजपा-मनसे युतीचे संकेत दिसू लागले आहेत.

कारण गेल्या दोन दिवसांत मनसे आणि भाजपा नेत्यांच्या भेटीगाठी वाढल्या आहेत. काल मनसे अध्यक्ष राज ठाकरे आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यात गुप्त बैठक झाल्याची बातमी समोर आली. दोघांमध्ये फडणवीसांच्या ‘सागर’ बंगल्यावर तासभर खलबतं झाली. त्यानंतर भाजपाचे राष्ट्रीय सरचिटणीस विनोद तावडे यांनी काल ‘शिवतीर्थ’वर जाऊन राज ठाकरे यांची भेट घेतली. आज थेट भाजपाचे नवनिर्वाचित प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे हे देखील राज ठाकरेंची भेट घेणार असल्याची माहिती समोर आली आहे. 

भाजपा नेते आणि राज ठाकरेंच्या भेटीगाठी वाढणं हे भाजपा-मनसेच्या युतीचे संकेत मानले जात आहेत. दोन्ही पक्षांमध्ये आगामी महापालिका निवडणुकीला सामोरं जातानाच्या रणनितीवर चर्चा झाल्याचं सांगण्यात येत आहे. दरम्यान, राज ठाकरे आणि फडणवीसांच्या कालच्या भेटीचं वृत्त मात्र दोन्ही पक्षाच्या नेत्यांकडून फेटाळण्यात आलं आहे. पण जसजसं निवडणूक जवळ येईल तसं चित्र अधिक स्पष्ट होईल असं सांगितलं जात आहे.

शिवसेनेत फूट पडल्यामुळे मुंबई महापालिका निवडणुकीतील अस्थिर राजकीय वातावरणाचा पक्षाला कसा फायदा होईल यासाठी मनसेकडून प्रयत्न केले जात असल्याचं सांगण्यात येत आहे. तसंच आगामी निवडणुकीत भाजपासोबतच्या युतीबाबतची चाचपणी करण्यासाठी सोमवारी सकाळी राज ठाकरे आणि देवेंद्र फडणवीस यांच्यात ‘सागर’ बंगल्यावर गुप्त बैठक झाल्याचं सांगण्यात येत आहे. दोघांमध्ये जवळपास तासभर चर्चा झाली. या भेटीबाबत कमालीची गुप्तता बाळगण्यात आली होती. 


LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here