मुंबई,दि.५: शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरेंना (Uddhav Thackeray) अजून मोठा धक्का बसण्याची शक्यता आहे. एकनाथ शिंदे यांनी बंड केल्यामुळे उद्धव ठाकरे यांना मुख्यमंत्रीपद सोडावे लागले. एकनाथ शिंदे भाजपाच्या पाठिंब्यावर मुख्यमंत्री झाले. एकनाथ शिंदे यांच्याबरोबर शिवसेनेचे ४० आमदार गेले आहेत. तसेच शिवसेनेमध्येही उभी फूट पडली आहे.
एकनाथ शिंदेंच्या बंडाला यश मिळण्याचे संकेत मिळू लागताच उद्धव ठाकरेंसोबत असलेल्या आमदारांपैकी अनेकांनी शिंदेंच्या गोटात उडी मारली. शिंदेंनी मुख्यमंत्रिपदाची जबाबदारी स्वीकारल्यावर आता शिवसेनेला अजून मोठे धक्के बसण्याची चिन्हे दिसू लागली आहेत. त्यातच आता उद्धव ठाकरे यांचे अत्यंत विश्वासू समजले जाणारे मिलिंद नार्वेकर हेही आता वेगळा विचार करत असल्याची चर्चा राजकीय वर्तुळात रंगली आहे. मिलिंद नार्वेकर आणि एकनाथ शिंदेंचे पुत्र खासदार श्रीकांत शिंदे यांच्यामध्ये काल विधानभवन परिसरात तासभर चर्चा झाल्याने तर्कवितर्कांना उधाण आले आहे.
२० जून रोजी विधान परिषद निवडणुकीचे मतदान आटोपल्यानंतर एकनाथ शिंदे यांनी काही आमदारांना सोबत घेत बंड केले होते. तसेच ते गुजरातमधील सूरत येथे पोहोचले होते. सुरुवातीला शिंदेंसोबत २० च्या आसपास आमदार होते. मात्र ही संख्या उत्तरोत्तर वाढत गेली. आज हा आकडा ४० च्या वर पोहोचल्याने उद्धव ठाकरेंसमोर शिवसेनेचं अस्तित्व वाचवण्याचं आव्हान निर्माण झालं आहे.
दरम्यान, एकनाथ शिंदेंनी बंड केल्यानंतर मिलिंद नार्वेकर यांना मध्यस्थीसाठी पाठवण्यात आले होते. मात्र त्यांच्या मध्यस्थील यश आले नव्हते. त्यानंतर मात्र या सर्व नाट्यात मिलिंद नार्वेकर फारसे सक्रिय नव्हते. त्यातच काल विधिमंडळाच्या विशेष अधिवेशनादरम्यान एकनाथ शिंदेंचे पुत्र श्रीकांत शिंदे आणि मिलिंद नार्वेकर यांच्यात तासभर चर्चा झाल्याचे वृत्त आले आहे. त्यामुळे अनेकांना आश्चर्याचा धक्का बसला असून, तर्कवितर्कांना उधाण आले आहे.