सोलापूर,दि.15: महाराष्ट्र काँग्रेसला लवकरच मोठा धक्का बसणार असल्याचे वृ्त Tv9 मराठीने दिले आहे. महाराष्ट्रात अनपेक्षित घटना घडत आहेत. देवेंद्र फडणवीस आणि अजित पवार यांचा पहाटेचा शपथविधी ते शिवसेनेतील एकनाथ शिंदे यांचे बंड या सर्व अनपेक्षित घटना घडल्या आहेत. अजित पवारांनीही बंड करत राष्ट्रवादी पक्षावर दावा सांगितला आहे. अलिकडच्या काळात अनेक नेत्यांनी भाजपा आणि शिंदे गटात प्रवेश केला आहे.
माजी खासदार मिलिंद देवरा यांनी शिंदे गटात (शिवसेना) प्रवेश केला आहे. त्यांच्याबरोबर 10 माजी नगरसेवकांनी शिंदे गटात प्रवेश केला आहे. राज्यातील राजकारणात लवकरच मोठा राजकीय भूकंप होईल असे भाजपा नेते मंत्री गिरीश महाजन यांनी जळगावात माध्यमांशी बोलताना म्हटले होते. विश्वास बसणार नाहीत असे लोक भाजपात प्रवेश करतील असे महाजन म्हणाले होते.
त्यामुळे मिलिंद देवरा यांचा शिवसेना प्रवेशाची घटना ही या भूकंपाला सुरुवात तर नाही ना? अशी चर्चा आता राजकीय वर्तुळात दबक्या आवाजात सुरु आहे. विशेष म्हणजे गिरीश महाजन यांनी पुन्हा तसंच राजकीय भूकंपाचं वक्तव्य केलं आहे. याबाबत वेगवेगळ्या चर्चा सुरु असताना Tv9 मराठीने काँग्रेसचे आमदार शिवसेनेत प्रवेश करणार असल्याचे वृत्त दिले आहे.
Tv9 मराठीने दिलेल्या वृत्तानुसार मिलिंद देवरा यांच्या शिवसेनेतील प्रवेशानंतर अनेक काँग्रेस आमदार आणि पदाधिकारी शिवसेनेच्या वाटेवर आहेत. विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकर यांनी 10 जानेवारीला शिवसेना आमदार अपात्रतेच्या प्रकरणावर निकाल दिला. त्यानंतर जवळपास 6 ते 7 काँग्रेस आमदार शिवसेनेत येण्यास तयार आहेत. याबाबत गुप्त बैठका देखील पार पडल्याची माहिती सूत्रांनी दिली आहे. त्यामुळे येणाऱ्या काळात शिवसेनेत मोठा पक्षप्रवेश होऊ शकतो, असे संकेत सूत्रांनी दिले आहेत.
भाजपप्रणित एनडीएच्या विरोधात विरोधकांची इंडिया आघाडी रणनीती आखत आहे. पण असं असताना काँग्रेसमधील 6 ते 7 आमदारांनी खरंच शिवसेनेत प्रवेश केला तर सत्ताधाऱ्यांची ताकद वाढू शकते. तसेच काँग्रेस पक्षाचं मोठं नुकसान होऊ शकतं.