मुंबई,दि.6: राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी शरदचंद्र पवार पक्षाचे ज्येष्ठ नेते एकनाथ खडसे पुढील 2 दिवसांत भाजपच्या आपल्या स्वगृही परतणार असल्याची चर्चा पुन्हा एकदा राजकीय वर्तुळात सुरू झाली आहे. पूर्वाश्रमीचे भाजप नेते एकनाथ खडसे हे पु्न्हा एकदा भाजपमध्ये प्रवेश करणार असल्याचं बोललं जात आहे. विशेष म्हणजे शनिवारी रात्रीच ते प्रवेश करतील, असं मराठी वृत्तवाहिनी एबीपी माझाने दिलेल्या बातमीमध्ये म्हटलंय.
एकनाथ खडसे यांचा भाजप प्रवेश जवळपास पक्का झाले आहे. पण त्यांच्या कन्या रोहिणी खडसे यांच्या राजकीय भवितव्यावर घोडे अडले आहे, असा दावा केला जात आहे. या नव्या घटनाक्रमामुळे जळगाव राजकारण चांगलेच तापले आहे.
एकनाथ खडसे हे 2014 मध्ये मुख्यमंत्री पदासाठी इच्छूक होते. परंतु पक्षाने त्यांच्याऐवजी देवेंद्र फडणवीसांना मुख्यमंत्रीपद दिलं. त्यामुळे नाराज झालेले खडसे विरुद्ध फडणवीस, असा संघर्ष सुरु झाला. पुढे त्यांच्यावर जमीन घोटाळ्याचे आरोपही झाले. पक्षांतर्गत हेटाळणीमुळे त्यांनी राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये प्रवेश केला होता.
एकनाथ खडसे हे पुन्हा एकदा भाजप मध्ये प्रवेश करणार आहेत. राष्ट्रवादी शरद पवार गटासाठी हा मोठा धक्का मानला जात आहे. एकनाथ खडसे पुन्हा भाजपवासी होणार अशा चर्चांना उधाण आले होते. त्यावर गिरीश महाजन आणि रक्षा खडसेंनी सूचक प्रतिक्रिया दिली होती. एकनाथ खडसेंचा संपर्क थेट वरच्या लोकांशी आहे, ते खालच्या लोकांशी संपर्क ठेवत नाहीत..त्यामुळे आपल्याकडे त्यांच्या प्रवेशाबद्दल माहिती नाही, असे गिरीश महाजन म्हणाले होते.