सोलापूर,दि.29 : पतीच्या निधनानंतर पत्नीने आत्महत्त्या केल्याची दुर्दैवी घटना घडली आहे. पतीच्या निधनानंतर पत्नीनेही रेल्वे खाली येऊन आत्महत्या केली आहे.
पतीचं आजारपणाने निधन झाल्यानंतर पत्नीनेही आपली जीवन यात्रा संपवली आहे. हे दापत्य मंगळवेडा तालुक्यातील शरदनगर (मल्लेवाडी) येथे राहत होते. आप्पासाहेब रावसाहेब कोरे वय 38 आणि अनुसया आप्पासाहेब कोरे वय 33 अशी दाम्पत्याची नावे आहेत.
पोलिसांकडून मिळालेल्या माहितीनुसार, मागच्या 8 दिवसापुर्वी मृत आप्पासाहेब कोरे याला निमोनिया आजार असल्यामुळे सोलापूर येथील यशोधरा या रुग्णालयात दाखल करण्यात आले होते. उपचारादरम्यान अप्पासाहेब कोरे यांचे बुधवारी पहाटे पाचच्या सुमारास निधन झाले. दरम्यान, पतीच्या निधनाचा धक्का पत्नी अनुसया कोरे यांना बसला.
हा धक्का सहन न झाल्यामुळे त्यांनी सोलापूर-पुणे या रेल्वे मार्गावर जाऊन रेल्वेच्या खाली आत्महत्या केली आहे. हा प्रकार आज सकाळी सोलापूरात रेल्वेस्टेशन भैय्याचौक बोगद्याजवळ घडला आहे. तर, या दापत्यांना 7 वर्षाचा मुलगा आहे. झालेला भरमसाठ खर्च आणि त्यात पतीच्या निधनाचं वृत्त ऐकून त्यांना धक्का बसला यातच त्यांनी सोलापूर रेल्वेस्टेशन नजीक रेल्वे रुळावर पुण्याच्या दिशेनं जाणाऱ्या गाडीखाली स्वतःला झोपून देवून आत्महत्या केली. अनुसया यांचे सासुसासरे, दिर आधीच मृत पावले आहेत.
दरम्यान, या घटनेमुळे मंगळवेढा परिसरात हळहळ व्यक्त होत आहे. याप्रकरणी अधिक तपास पोलिस अधिकारी प्रल्हाद चव्हाण करत आहेत.