बीड,दि.15: खंडणी प्रकरणात कोठडीत असलेल्या वाल्मीक कराडला (Walmik Karad) अखेर ‘मकोका’ लावण्यात आला आहे. केज न्यायालयाने काल वाल्मीकला न्यायालयीन कोठडी देताच त्याच्या वकिलाने जामिनासाठी अर्ज केला. परंतु एसआयटीने संतोष देशमुख हत्या प्रकरणात कराडला ‘मकोका’ लावण्यात येत असल्याचे न्यायालयाला सांगितले. एसआयटीने लगेच प्रॉडक्शन वॉरंट दाखवून वाल्मीक कराडचा ताबाही घेतला.
वाल्मिक कराडवर मकोका लावल्यानंतर त्याला आज कोर्टासमोर हजर केलं जाणार आहे. वाल्मिकला बीडच्या कारागृहातून कोर्टात आणलं जाणार आहे. संतोष देशमुख हत्ये प्रकरणात काल वाल्मिक कराडला 302 च्या गुन्ह्यात मकोका लावण्यात आला. त्यानंतर कोर्टाने त्याच्याविरोधात वॉरंट जारी केलं. त्यानुनसार त्याला आज केज कोर्टात दाखल करण्यात येणार आहे. सध्या खंडणीच्या गुन्ह्यात वाल्मिक कराड 14 दिवसाच्या न्यायालयीन कोठडीत आहे. SIT आज त्याला ताब्यात घेऊन चौकशी सुरू करणार आहे.
वाल्मीक कराडवर ‘मकोका’ लागताच अवघ्या दहा मिनिटांत परळी शहर बंद करण्यात आले. कराडच्या समर्थकांनी शहरात जाळपोळ केली. रस्त्यावर टायर पेटवले. बसवर दगडफेक केली. काही समर्थक टॉवरवरही चढले. परळी पोलीस ठाण्यासमोर कराडच्या कुटुंबासह महिलांनी ठाण मांडून त्याच्यावरील गुन्हे मागे घेण्याची मागणी केली. रात्री उशिरापर्यंत हिंसक आंदोलन सुरूच होते. त्यामुळे परळीत तणाव आणि भीतीचे वातावरण पसरले आहे.
परळी बंदची हाक
वाल्मिक कराडवर मोकको लागताच त्याचे समर्थक आक्रमक झाले आहेत. त्यांनी आज परळी बंदची हाक दिलीय. सकाळी 10 वाजता कराड समर्थक बैठक घेऊन आंदोलनाची पुढील दिशा ठरवणार आहेत. तर या प्रकरणाचा तपास निष्पक्ष व्हावा, तसंच वाल्मिक कराडला खोट्या गुन्ह्यात अडकवू नये अशा मागण्यांचं निवेदन, कराड समर्थकांनी अतिरिक्त पोलीस अधीक्षकांना दिलं. काल दिवसभर परळी पोलीस ठाण्याबाहेर कराड समर्थकांचं आंदोलन सुरु होतं. सध्या परळीत तणावापूर्ण शांतता आहे. काही अनुचित प्रकार घडू नये म्हणून ठिकठिकाणी पोलिसांचा बंदोबस्त लावण्यात आला आहे.