राजन साळवींना मतदान करा, शिवसेनेचे प्रतोद सुनिल प्रभूंकडून व्हीप जारी

0

मुंबई,दि.२: राजन साळवींना मतदान करा असा व्हीप शिवसेनेचे प्रतोद सुनिल प्रभूंकडून जारी करण्यात आला आहे. विधानसभा अध्यक्षपदाच्या निवडणुकीसाठी भारतीय जनता पार्टी आणि महाविकास आघाडीने आपल्या उमेदवारांची नावे घोषित केली आहेत. भाजपाकडून राहुल नार्वेकर तर महाविकास आघाडीकडून शिवसेनेचे आमदार राजन साळवी यांना उमेदवारी देण्यात आली आहे. त्यामुळे आता विधानसभा अध्यक्षपदाची निवडणूक विधान परिषद आणि राज्यसभेप्रमाणे चुरशीची ठरणार आहे. उद्या ३ जुलै रोजी ही निवडणूक पार पडणार आहे.

या निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर विधीमंडळाचे पक्ष प्रतोद सुनील प्रभू यांच्याकडून एकनाथ शिंदे यांच्यासह सर्व आमदारांना व्हीप जारी केला आहे. महाविकास आघाडीचे उमेदवार राजन साळवी यांनाच सर्वांनी मतदान करावं, असा आदेश आमदारांना देण्यात आला आहे. त्यामुळे शिंदे गटाचे आमदार सुनील प्रभू यांचा व्हीप पाळणार का? याबाबत शंका निर्माण झाली आहे. तसेच ठाकरे समर्थक आमदार आणि शिंदे समर्थक आमदार यांच्यात संघर्ष निर्माण होण्याची शक्यता आहे.

दरम्यान, राहुल नार्वेकर यांना विधानसभा अध्यक्षपदाची उमेदवारी देत भारतीय जनता पार्टीने जे धक्कातंत्र अवलंबिले, ते मंत्रिपदांची संधी देतानाही वापरले जाईल, असे आता म्हटले जात आहे. त्यामुळे पक्षातील एक-दोन दिग्गज, प्रस्थापितांना विश्रांती दिली जाऊ शकते. मंत्रिमंडळात हमखास समावेश होणार म्हणून ज्यांची नावे माध्यमांतून दिली जात आहेत, त्यांना भूकंपाचा तडाखा बसू शकतो. विशेषत: नार्वेकर यांना अनपेक्षितरित्या संधी दिली गेल्याने प्रस्थापितांमध्ये चिंतेचे वातावरण आहे.

खरंतर, एकनाथ शिंदे हे शिवसेनेचे विधीमंडळातील गटनेते होते. पण त्यांनी बंडखोरी केल्यानंतर तातडीची कारवाई म्हणून उद्धव ठाकरे यांनी त्यांची गटनेते पदावरून हकालपट्टी केली होती. तसेच नवीन गटनेते म्हणून अजय चौधरी यांची नियुक्ती केली होती. त्यानंतर आज विधानसभा अध्यक्षपदाच्या निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर विधीमंडळाचे पक्ष प्रतोद सुनील प्रभू यांनी एकनाथ शिंदे यांच्यासह सर्व आमदारांसाठी व्हीप जारी केला आहे. महाविकास आघाडीचे उमेदवार राजन साळवी यांनाच मतदान करण्याचे आदेश देण्यात आले आहेत.

सासरे सभापती, जावई अध्यक्ष?

भाजप-शिंदे गटाकडील संख्याबळ लक्षात घेता, नार्वेकर यांची निवड निश्चित मानली जाते. या निमित्ताने एक वेगळाच योगायोग साधला जाणार आहे. नार्वेकर यांचे सासरे रामराजे नाईक- निंबाळकर हे महाराष्ट विधान परिषदेचे सभापती आहेत. त्यामुळे सासरे विधान परिषदेचे सभापती, तर जावई विधानसभेचे अध्यक्ष असा अपूर्व योग जुळून येऊ शकतो. निंबाळकर यांच्या कन्या सरोजिनी या नार्वेकर यांच्या पत्नी आहेत.

त्यामुळे उद्या विधान सभेत ठाकरे समर्थक आमदार आणि शिंदे समर्थक आमदारांत संघर्ष निर्माण होण्याची चिन्हे आहेत. एकनाथ शिंदे यांच्यासह बंडखोर आमदार सुनील प्रभू यांचा व्हीप पाळणार का? याकडे सर्वांचं लक्ष लागलं आहे.


LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here