दि.६: Vladimir Putin: रशिया युक्रेन युद्धामुळे (Russia Ukraine War) अनेक सनिकांचा मृत्यू झाला आहे. रशिया युक्रेनच्या सैनिकांचा मोठ्या प्रमाणात मृत्यू झाला आहे. युद्ध गेल्या दहा दिवसांपासून सुरू आहे. रशियाकडून युक्रेनच्या सैनिकांना मोठ्या प्रमाणात मारल्याचा दावा करण्यात येत आहे तर युक्रेनकडून रशियाच्या सैनिकांना मोठ्या प्रमाणात मारल्याचा दावा करण्यात आला आहे. युद्धात शहीद झालेल्या सैनिकांचा आकडा हजारोंच्या घरात असला तरी त्याचा नेमका आणि अधिकृत आकडा अद्याप समोर आलेला नाही. यातच रशियाचे राष्ट्राध्यक्ष व्लादिमीर पुतीन (Vladimir Putin) यांनी युद्धाच्या ११ व्या दिवशी शहीद जवानांसाठी मोठी घोषणा केली आहे. युक्रेन विरुद्धच्या युद्धात शहीद झालेल्या जवानांच्या कुटुंबीयांना आर्थिक मदत देण्याची घोषणा पुतीन यांनी केली आहे. युद्धात शहीद झालेल्या प्रत्येक जवानाच्या कुटुंबीयांना ५ मिलियन रुबल (४० लाख रुपये) आणि जखमी जवानांसाठी ३ मिलियन रुबल (२४ लाख रुपये) आर्थिक मदत म्हणून जाहीर केले आहेत.
रशियानं हल्ला सुरू केल्यानंतर २८ फेब्रुवारी रोजी युक्रेनचे राष्ट्राध्यक्ष वोलोदिमीर जेलेन्स्की यांनी आपल्या सैनिकांना दरमहा १,००,००० रिव्निया (युक्रेनी चलन) अर्थसहाय्य देण्याची घोषणा केली आहे. युक्रेनी लष्कराला मजबूत करण्यासाठी आवश्यक असे सर्व प्रयत्न केले जातील असं ते म्हणाले होते.
अल-जजीराच्या रिपोर्टनुसार रशियन संरक्षण मंत्रालयाकडून युद्धात मृत्यूमुखी पडलेल्यांची पहिली आकडेवारी समोर आली आहे. यातील नोंदीनुसार रशियाचे आतापर्यंत ४९८ सैनिक मारले गेले आहेत. तर १,५९७ सैनिक जखमी झाली आहे. काही दिवसांपूर्वी रशियाच्या संरक्षण मंत्रालयाचे प्रवक्ते इगोर कोनाशेनकोव यांनी मृतांच्या कुटुंबीयांना आवश्यक अशी सर्व आर्थिक मदत केली जाईल असं आश्वासन दिलं होतं. त्यांनी रशियानं युक्रेनच्या २,८७० हून अधिक सैनिक मारल्याचा दावा केला होता. तर ३,७०० सैनिक जखमी झाल्याचं ते म्हणाले होते. याशिवाय ५७२ सैनिकांना ताब्यात घेतल्याचीही माहिती त्यांनी दिली होती. दरम्यान, युक्रेननं रशियाचे कमीत कमी ४,५०० सैनिक मारल्याचा दावा केला आहे.
रशियानं युक्रेन विरोधात युद्धाची घोषणा केल्यानंतर तातडीनं हवाई हल्ल्यांच्या माध्यमातून कारवाई सुरू करण्यात आली होती. या संघर्षात रशियानं सुरुवातीला ६३ हजाराहून अधिक सैनिक तैनात केले होते. दरम्यान, युद्धात रशियाचे नेमके किती सैनिक मारले गेले याचा अधिकृत आकडा समोर आलेला नाही.
Home आंतरराष्ट्रीय Vladimir Putin: रशियाचे राष्ट्राध्यक्ष व्लादिमीर पुतीन यांनी सैनिकांसाठी केली मोठी घोषणा