सांगली,दि.25: काँग्रेस नेत्यांनी सांगली येथे मेळावा घेतला. यावेळी काँग्रेस कार्यकर्ते आक्रमक झाल्याचे दिसून आले. सांगली लोकसभेची जागा शिवसेना ठाकरे गटाला सोडण्यात आली आहे. येथून चंद्रहार पाटील हे शिवसेना ठाकरे गटाचे उमेदवार आहेत. काँग्रेस कडून इच्छुक असलेले विशाल पाटील यांनी बंडखोरी केली आहे. काँग्रेसला मतदारसंघ न मिळाल्याने काँग्रेस कार्यकर्ते नाराज आहेत.
बंडखोरीनंतर काँग्रेस नेत्यांनी इथे मेळावा घेतला. या मेळाव्याला काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष नाना पटोले, पृथ्वीराज चव्हाण, बाळासाहेब थोरात उपस्थित होते. काँग्रेस नेत्यांनी कार्यकर्त्यांची समजूत काढण्याचाही प्रयत्न केला. सांगलीतली जागा न मिळाल्यामुळे विशाल पाटील यांनी बंडखोरी करत अपक्ष उमेदवारी अर्ज दाखल केला आहे.
सांगलीची जागा ठाकरेंच्या शिवसेनेकडे गेल्याने काँग्रेसमध्ये प्रचंड नाराजी आहे. ही नाराजी आज काँग्रेसच्या मेळाव्यातही दिसून आली. विशाल पाटील यांनी बंडखोरी केली. सांगलीची जागा काँग्रेसलाच मिळणार, हे ठरलेलं होतं मात्र उद्धव ठाकरेंनी परस्पर उमेदवार दिला, त्यामुळे आता तुम्हाला काँग्रेसची मतं मिळतील, मात्र विधानसभेला मतं मागायला येऊ नका, असं म्हणत विश्वजीत कदमांनी उद्धव ठाकरेंना ठणकावलं.
दरम्यान विश्वजीत कदमांच्या वक्तव्याशी आम्ही सहमत आहोत असं नाना पटोले म्हणाले. तर सांगलीच्या भावना सर्व नेत्यांना माहित आहे, मात्र भाजपला हद्दपार करण्यासाठी आघाडीचा धर्म पळाला पाहिजे, असं बाळासाहेब थोरात म्हणाले.
मग विश्वजीत कदम यांचा मान का ठेवला नाय
दरम्यान या मेळाव्यात संतप्त झालेल्या काँग्रेस कार्यकर्त्यांनी पोस्टर घेऊन घोषणाबाजी केली. आमच्या रक्तात काँग्रेस हाय.. मग विश्वजीत कदम यांचा मान का ठेवला नाय, असे पोस्टर घेऊन कार्यकर्ते आले होते. विश्वजीत कदम यांच्या नेतृत्वात विशाल पाटलांचा प्रचार करणार, अशी भूमिका कार्यकर्त्यांनी मांडली.
विश्वजीत कदम म्हणाले, “आमच्यात अस्वस्थता झाली की, काय करायचं? मला एकच सांगायचं आहे आणि खरं सांगायचं आहे. आम्ही ही जागा मिळावी म्हणून पोटतिकडीने प्रयत्न केले. कुणी मला टोमणे मारले मागच्या दीड महिन्यात. कशाला करतोय विश्वजित, तुलाच त्रास होईल. तुझ्या घरातील उमेदवारी आहे का? अनेकांनी अनेक गोष्टी सांगितल्या. पण मी सांगितलं की मी पंजासाठी लढत आहे.”
विश्वजीत कदम म्हणाले, “राज्यसभेच्या खासदारकीची आम्ही दोन पक्षांकडून… काँग्रेस आणि शिवसेनेकडून कबुली घेतली. मी सांगितलं की, अरे भावा, नको या भानगडीत पडू. अपक्ष लढणं वेगळं असतं. लोकसभेला लढणं वेगळं असतं. काही लोक आज तुझ्याकडे प्रेमापोटी येत असतील. काही लोक याच्यासाठी येत असतील. यात नको फसू. राज्यसभा काही वाईट नाही. आहे तसा खासदार फंड मिळेल. आहे तसा मानसन्मान मिळेल. तरुण वयात राज्यसभेत जाणं म्हणजे काही नाही. खासदार झालं. हरकत नाही. पुढची लोकसभा कुणी आडवा येऊ दे, तुमच्या विश्वासाने तुला खासदार म्हणून निवडून देईल हा विश्वास मी दिला. मी कुठलीही कसर सोडली नाही. कुणाला वाऱ्यावर सोडलं नाही.”
याचा वचपा नक्की विधानसभेत काढू…
‘याचा वचपा नक्की विधानसभेत काढू. मविआच्या उमेदवाराला मतदान होईल, पण पुन्हा मित्रपक्षांना समजवून सांगा, विधानसभेला हा वाद होणार नाही, याची काळजी घ्या. मित्रपक्षाला सांगा, काँग्रेसची 100 टक्के मतं मिळणार आहेत, पण पुढे विधानसभेला आवाज काढायचा नाही’, असा इशारा विश्वजीत कदम यांनी दिला आहे.








