ठाकरे गटाच्या नेत्याचा मिलिंद देवरा यांच्याबाबत मोठा दावा

0

मुंबई,दि.१५: ठाकरे गटाच्या नेत्याने मिलिंद देवरा यांच्याबाबत मोठा दावा केला आहे. मिलिंद देवरा यांनी कालच शिंदे गटात प्रवेश केला आहे. जागावाटपात दक्षिण मुंबई लोकसभा जागा काँग्रेस पक्षाला मिळणार नसल्याने देवरा यांनी काँग्रेस पक्ष सोडल्याची चर्चा आहे. अशातच ठाकरे गटाचे नेते खासदार विनायक राऊत यांनी मोठा दावा केला आहे.

माजी खासदार मिलिंद देवरासह १० माजी नगरसेवकांनी काल (दि.१४) शिंदे गटात प्रवेश केला. मिलिंद देवरा यांनी शिंदे गटात प्रवेश केल्यानंतर काँग्रेस आणि ठाकरे गटावर जोरदार टीका केली. देवरा म्हणाले की, मी पक्षाच्या आव्हानात्मक काळात काँग्रेससोबत होतो. माझ्या वडिलांच्या काळातील काँग्रेस आणि आजची काँग्रेसमध्ये जमीन अस्मानचा फरक आहे. जर काँग्रेस आणि उद्धव ठाकरे यांनी यांनी सकारात्मक, मेरिट आधारित राजकारण केलं असतं तर एकनाथ शिंदे आणि मला आज इथे येऊन बसावं लागलं नसतं.

देवरा यांनी उध्दव ठाकरे यांच्या टीका केली होती. ठाकरे गटाचे नेते आणि खासदार विनायक राऊत यांनी प्रत्युत्तर दिले. मिलिंद देवरा यांनी शिंदे गटात प्रवेश केल्यामुळे हा महाविकास आघाडीला मोठा धक्का मानला जात आहे. तसेच असे अनेक धक्के बसतील असा दावा केला जात आहे.

यावर बोलताना विनायक राऊत म्हणाले की, याला आम्ही धक्के म्हणत नाही. प्रत्येक पक्षात असा टाकाऊ माल असतो. ही घाण निघून जातेय ते बरे झाले. शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांनी सर्वांत आधी मिलिंद देवरा यांच्या वडिलांना म्हणजेच मुरली देवरा यांना मुंबईच्या महापौरपदी बसवले होते. अशी ब्याद आम्हाला शिवसनेत नको होती. ते आमच्याकडे येण्याचा प्रयत्न करत होते, असे विनायक राऊत यांनी म्हटले आहे. 

मिलिंद देवरा काही दिवसांपूर्वी म्हणाले होते की, मला दक्षिण मुंबई मतदारसंघातून लोकसभेचे तिकीट द्या, मी तुमच्याकडे येतो. आमच्या पक्षात येण्याची इच्छा व्यक्त केली होती. परंतु, आमचे पक्षप्रमुख उद्धव ठाकरे हे दक्षिण मुंबईचे स्थानिक खासदार अरविंद सावंत यांच्या पाठिशी ठामपणे उभे राहिले. त्यामुळे मिलिंद देवरा त्या दुकानात गेले जिथे त्यांना विकत घेण्यास तयार होते. देवरा शिंदे गटात गेले असले तरी दक्षिण मुंबईतील मुंबईकर जनता त्यांचा सुपडा साफ करेल. देवरा यांना भविष्यात संसद कधीच दिसणार नाही, अशा पद्धतीने मुंबईकर त्यांचा पराभव करतील, अशी टीका विनायक राऊत यांनी केली.


LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here