बीड,दि.२०: प्रसिद्ध कीर्तनकार इंदुरीकर महाराज (Indurikar Maharaj) यांच्यावर फसवणुकीचा गुन्हा दाखल करण्याची गावकऱ्यांनी मागणी केली आहे. इंदुरीकर महाराज (Indurikar Maharaj) हे नेहमीच आपल्या वक्तव्यामुळे अडचणीत आले आहेत. इंदुरीकर महाराजांवर गुन्हा दाखल करा अशी मागणी नेकनूरमध्ये करण्यात आली आहे. इंदुरीकर महाराजांवर फसवणुकीचा गुन्हा दाखल करा या मागणीसाठी नागरिकांनी नेकनूर पोलीस ठाण्यासमोर ठिय्या आंदोलन केले. बीडमध्येच नव्हे तर संपूर्ण महाराष्ट्रात आपण महाराजांवरती वेगवेगळे गुन्हे दाखल झाले पाहिजे, अशी मागमी आंदोलक नागरिक करत आहेत.
कीर्तनकार इंदुरीकर यांच्यावर गुन्हा दाखल करण्यासाठी नेकनूर पोलीस ठाण्यात नागरिकांनी मोठी गर्दी केलेली होती. या मागणीबाबत मिळालेल्या माहितीनुसार, कळसंबर गाव येथे निवृत्ती महाराज इंदुरीकर यांचे कीर्तन ठेवण्यात आले होते. मात्र अचानक महाराजांनी कार्यक्रम रद्द करण्याचा आदेश दिल्यामुळे गावकऱ्यांमध्ये संताप पहायला मिळत आहे. गावकऱ्यांनी महाराजांच्या कार्यक्रमासाठी एक ते दीड लाख खर्च केला होता. यामुळे महाराजांनी अचानक कार्यक्रम रद्द केल्यामुळे महाराजांवर फसवणुकीचा गुन्हा दाखल करावा अशी मागणी कळसंबर गावातील नागरिकांनी नेकनूर पोलीस स्टेशनमध्ये केली आहे.
यावेळी कळसंबर गावातील काही संतप्त नागरिक यांनी आपल्या प्रतिक्रिया व्यक्त केल्या आहेत. इंदुरीकर महाराज यांच्या वतीने आज आम्हाला कीर्तनासाठी शब्द दिला होता. आजची तारीख नक्की करण्यात आली होती. त्यानंतर आम्ही गावकऱ्यांनी सुमारे सव्वालाख रुपये खर्चून कीर्तनाची पूर्ण तयारी केली आहे. मात्र अचानक इंदुरीकर महाराज यांनी कीर्तन रद्द केल्याचा निरोप आम्हाला आला. हे बरोबर नाही. आम्ही पैसे गोळा करून हा कार्यक्रम ठेवला होता. मात्र, आजच्याच दिवशी त्यांनी इतर ठिकाणी कुठे कीर्तन ठेवले तर मात्र आम्ही त्यांच्या विरोधात फसवणुकीचा गुन्हा दाखल करणार आहोत, असे एका संतप्त गावकऱ्याने सांगितले.
जर तुम्हाला बरे नसेल, पित्ताचा त्रास होत असेल तर आम्ही तुम्हाला दवाखान्यात नेतो. मात्र दिलेला शब्द मोडू नका. आमची फसवणूक करू नका. गावातील लोकांनी २-२ रुपये गोळा करून रक्कम जमा केलेली होती. असे फसवणे बरे नाही. निदान तुम्ही लोकांना फसवू तरी नका. जर तुम्ही आम्हांला फसवून इतर ठिकाणी कीर्तन केले तर तुमच्यावर गुन्हा दाखल करण्याची जबाबदारी आमची आहे, असे गावकरी म्हणाले.