विजयसिंह मोहिते पाटील यांनी घेतली राजन पाटील यांची भेट

0

सोलापूर,दि.19: माजी उपमुख्यमंत्री विजयसिंह मोहिते पाटील यांनी माजी आमदार राजन पाटील यांची भेट घेतली आहे. राजन पाटील हे राष्ट्रवादीचे (अजित पवार गट) नेते आहेत. तर नुकतेच विजयसिंह मोहिते पाटील यांनी पुतण्या धैर्यशील मोहित पाटील यांच्यासह राष्ट्रवादीत (शरद पवार गट) प्रवेश केला आहे. धैर्यशील मोहित पाटील हे माढा लोकसभा निवडणुकीत महाविकास आघाडीचे उमेदवार आहेत. तर सोलापूर लोकसभा निवडणुकीत आमदार प्रणिती शिंदे या महाविकास आघाडीचे उमेदवार आहेत.

नुकतीच शरद पवार, सुशीलकुमार शिंदे आणि विजयसिंह मोहिते पाटील यांची अकलुज येथे भेट व चर्चा झाली होती. सोलापूर लोकसभा मतदार संघातून माजी केंद्रीय गृहमंत्री सुशीलकुमार शिंदे यांची कन्या प्रणिती शिंदे तर माढा लोकसभा मतदार संघातून विजयसिंह मोहिते पाटील पुतणे धैर्यशील मोहिते पाटील उमेदवार आहेत. त्यामुळे विजयसिंह मोहिते पाटील प्रणिती शिंदे यांना निवडून आणण्यासाठी प्रयत्न करणारच.

विजयसिंह मोहिते पाटील हे अॅक्टीव्ह झाले आहेत. काल त्यांनी मोहोळ तालुक्यातील अनगर येथे जावून माजी आमदार राजन पाटील यांची भेट घेतली. त्यामुळं राजकीय वर्तळात चर्चांना उधाण आलं आहे. मोहोळ विधानसभा मतदारसंघ हा सोलापूर लोकसभा मतदारसंघात येत आहे.

अजित पवारांची राष्ट्रवादी महायुतीचा घटकपक्ष असल्याने राजन पाटील यांनी सोलापूर लोकसभा मतदारसंघात भाजप उमेदवार राम सातपुते यांना आपला पाठिंबा जाहीर केला होता. मात्र सोलापुरातून काँग्रेसचे ज्येष्ठ नेते सुशीलकुमार शिंदे यांची कन्या प्रणिती शिंदे या महाविकास आघाडीच्या उमेदवार आहेत. त्यामुळे शिंदे यांना पाठिंबा देण्याची विनंती करण्यासाठी विजयसिंह मोहिते पाटलांनी मोहोळच्या राजकारणावर वर्चस्व असणाऱ्या राजन पाटलांची भेट घेतल्याचे समजते. 

राजन पाटील हे अजित पवार यांचे कट्टर समर्थक असून सोलापूर लोकसभा युतीचे उमेदवार राम सातपुते यांच्यासाठी त्यांनी प्रचाराचा जोरदार धडाका सुरू केला आहे. आता मोहिते पाटील यांच्या भेटीनंतर राजन पाटील काय भूमिका घेतात याकडे जिल्ह्याचे लक्ष लागले आहे. 


LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here