सोलापूर,दि.5: ग्रामदैवत श्री सिध्देश्वर मंदिर, विष्णू घाट, लक्ष्मी भाजी मार्केट येथील शौचालय व कचराकुंडी हटविण्याची मागणी वीरशैव व्हिजनच्यावतीने महानगरपालिका अतिरिक्त आयुक्त रवि पवार यांच्याकडे निवेदनाद्वारे करण्यात आली.
यावेळी माजी नगरसेवक रमेश व्हटकर, वीरशैव व्हिजनचे संस्थापक अध्यक्ष राजशेखर बुरकुले, श्रीकांत कट्टीमनी, सोमशेखर खुब्बा, राम राजमाने, सहकोषाध्यक्ष विजयकुमार बिराजदार, सहकार्याध्यक्ष राजेश नीला, मनोज पाटील, शिवानंद येरटे, मेघराज स्वामी, अमित कलशेट्टी, सोमनाथ चौधरी, ओंकार सालेगाव, बसवराज चाकाई उपस्थित होते.
सोलापूरचे ग्रामदैवत श्री सिध्देश्वर मंदीर हे समस्त सोलापूरकरांची अस्मिता आहे. या मंदिराचे विष्णु घाट, लक्ष्मी भाजी मार्केटसमोर प्रवेशद्वार आहे, या प्रवेशद्वाराच्या शेजारी सुलभ शौचालय आहे. तसेच तिथे कचराकुंडीत कचरा टाकला जातो, प्रचंड घाणीचे साम्राज्य असते, त्यामुळे दुर्गंधी पसरते. मोकाट जनावरे येतात. मलमूत्र विसर्जन करतात. त्यामुळे मंदिराचे तलावाचे पावित्र्य धोक्यात आले आहे.
मंदिरासमोर शौचालय असणे अयोग्य आहे. ती सोलापूरकरांसाठी शरमेची बाब आहे त्यामुळे ते शौचालय त्वरीत हटविण्यात यावे. तो परिसर स्वच्छ ठेवण्यात यावा. तसेच पासपोर्ट कार्यालय ते डॉ. निर्मलकुमार फडकुले सभागृह या रस्त्यावरील बाजूने तलावात सांडपाणी येते. त्याचाही बंदोबस्त करावा. त्यामुळे मंदिराचे, तलावाचे पावित्र्य व सौंदर्य अबाधित राहील. महापालिकेने कार्यवाही न केल्यास आंदोलन करण्याचा इशाराही यावेळी निवेदनाद्वारे देण्यात आला.