वसंत मोरे यांनी केली मोठी घोषणा, वंचित सोडण्याचे सांगितले कारण

0

मुंबई,दि.4: वसंत मोरे यांनी मोठी घोषणा केली आहे. एकेकाळचे राज ठाकरे यांचे निष्ठावान म्हणून वसंत मोरे ओळखले जात होते. मात्र लोकसभा निवडणूकीपूर्वी त्यांनी वंचित बहुजन आघाडीत प्रवेश करत लोकसभा निवडणूक लढवली. मात्र त्यांचा पराभव झाला. मोरे यांनी शिवसेनेचे (ठाकरे गट) प्रमुख नेते उद्धव ठाकरे यांची भेट घेतली. संजय राऊत हे देखील यावेळी उपस्थित होते. यावेळी वसंत मोरे तुम्ही स्वगृही येताय, पण उशीर केला असे म्हटल्याचे मोरे यांनी सांगितले. तसेच आपण ठाकरे शिवसेनेत प्रवेश करणार असल्याचेही मोरे यांनी जाहीर केले. 

वंसत मोरे यांनी लोकसभा निवडणुकीत पुण्यातून उमेदवारी हवी होती. पण पक्षांतर्गत गटबाजीमुळे आपल्याला पक्ष उमेदवारी देत नसल्याचा आरोप त्यांनी केला होता. ठाकरे गटाकडून उमेदवारी मिळावी यासाठीही त्यांनी प्रयत्न केले. यासाठी त्यांनी संजय राऊतांची भेटही घेतली होती. पण महाविकास आघाडीत ही जागा काँग्रेसला मिळाल्याने त्यांना उमेदवारी मिळू शकली नाही.

अखेर त्यांनी वंचितच्या तिकीटावर पुण्यातून निवडणूक लढली.  मात्र लोकसभा निवडणुकीत त्यांचा मोठा पराभव झाला होता. यानंतर आता आगामी विधानसभा निवडणुकीचा विचार करता वसंत मोरे शिवसेना ठाकरे गटात प्रवेश करणार आहेत. वसंत मोरे यांना खडकवासला किंवा हडपसर मतदारसंघातून उमेदवारी दिली जाण्याची शक्यता आहे. 

वंचित सोडण्याचे कारण सांगितले

वंचित सोडण्यामागील कारण विचारलं असता वसंत मोरे म्हणाले की, “मी वंचितमध्ये गेलो होतो. मला मतदारांनी स्विकारलं नाही, यामुळे मी बाळासाहेबांसोबत बोललो होतो. पुण्यात मतांचा टक्का हवा तितका नव्हता. त्यामुळे मी ठाकरे गटात प्रवेश करत आहे”. 

विधान सभा लढविणार का या प्रश्नावर मोरे यांनी आता पक्ष प्रवेश करू, नंतर यावर चर्चा करू असे मोरे म्हणाले. तसेच विधासभा लढविण्यासाठी माझ्याकडे दोन पर्याय आहेत. खडकवासला आणि हडपसर या दोन्ही मतदारसंघातून मी लढू शकतो. लोकसभेला पुणे शहरात माझे मतदान नव्हते, माझा तो भागही नव्हता. तरीही मला चांगली मते मिळाली आहेत. माझ्यावर पहिला गुन्हा शिवसेनेत असताना झाला. मी बदलणार नाही, जनतेसाठी, जनतेच्या हितासाठी काम करत राहू, असेही मोरे यांनी स्पष्ट केले. 


LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here