केंद्रीय गृह राज्यमंत्री अजय मिश्रा यांनी पत्रकारांना दिली शिवी; हातही उचलला

0

लखीमपूर,दि.15: केंद्रीय गृह राज्यमंत्री अजय मिश्रा टेनी (Union Minister of State for Home Affairs Ajay Mishra Teni) पुन्हा एकदा वादाच्या भोवऱ्यात सापडले आहेत. कारागृहात असलेला त्यांचा मुलगा आशिष मिश्रा (Ashish Mishra) यांच्याबाबत पत्रकारांनी केंद्रीय मंत्र्याला प्रश्न विचारला असता ते रागाला आले. मंत्र्यांनी उपस्थित पत्रकारांचा माईक हिसकावून घेत त्यांना चोर म्हणत शिवीगाळ केली.

लखीमपूरमधील (Lakhimpur) ओयल येथे मदर चाइल्ड केअर हॉस्पिटलच्या ऑक्सिजन प्लांटचे उद्घाटन करण्यासाठी मंत्री अजय मिश्रा आले होते. यावेळी लखीमपूर खीरी प्रकरणी (Lakhimpur Kheri Case) एसआयटीच्या अहवालावर एका पत्रकाराने प्रश्न विचारला. त्याला उत्तर देताना मिश्रा यांचा तोल सुटला. ‘हा प्रश्न त्या एसआयटीला जाऊन विचारा. तुला वेड लागलंय का. तुम्ही सा… मीडियावाल्यांनी एका निर्दोष व्यक्तीला अडकवलं आहे. तुम्हाला लाज वाटली पाहिजे. किती वाईट वागताय तुम्ही. तुम्हाला काय माहीत आहे’, असे म्हणत अजय मिश्रा या पत्रकाराच्या अंगावर धावून गेले. या घटनेचा व्हिडिओही समोर आला आहे. त्यात अजय मिश्रा यांनी पत्रकारावर हात उचलला असता इतरांनी त्यांना रोखल्याचे दिसत आहे.

3 ऑक्टोबर रोजी लखीमपूरच्या टिकुनिया येथे झालेल्या हिंसाचारात 8 जणांचा मृत्यू झाला होता. केंद्रीय गृह राज्यमंत्री अजय मिश्रा टेनी यांचा मुलगा आशिष मिश्रा उर्फ मोनू याने शेतकऱ्यांना जीपने चिरडल्याचा आरोप आहे. यानंतर संतप्त जमावाने आशिषच्या चालकासह चार जणांची हत्या केली. या प्रकरणात 14 जणांना आरोपी करण्यात आले आहे. दुसरीकडे, अजय मिश्रा भाजपच्या तिकिटावर 2012 च्या यूपी विधानसभा निवडणुकीत निघासन मतदारसंघातून आमदार झाले होते. मात्र, त्यानंतर सपाचे सरकार स्थापन झाले होते.

दरम्यान, लखीमपूर खीरी प्रकरणात एसआयटीचा अहवाल आल्यानंतर विरोधक आक्रमक झाले आहेत. काँग्रेस नेते राहुल गांधी यांनी अजय मिश्रा यांचा तत्काळ राजीनामा घेण्यात यावा, अशी मागणी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्याकडे केली आहे. इतर पक्षांनीही मिश्रा यांचा राजीनामा मागितला आहे. त्यामुळे सरकारवर दबाव वाढत असतानाच पत्रकारांशी केलेल्या असभ्य वर्तनाने मिश्रा हे अधिक गोत्यात येण्याची शक्यता आहे.


LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here