नवी दिल्ली,दि.१२: पंतप्रधान पदाबाबत केंद्रीय गृहमंत्री अमित शाह (Amit Shah) यांनी मोठे विधान केले आहे. आगामी लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर भाजपने आता कंबर कसली असून, देशभरात अनेक ठिकाणी विविध प्रकारचे कार्यक्रम हाती घेतले जात आहेत. केंद्रीय मंत्री देशातील विविध राज्यांना भेटी देत असून, मोर्चेबांधणीला सुरुवात केली आहे. केंद्रीय गृहमंत्री आणि भाजप ज्येष्ठ नेते अमित शाह तामिळनाडू दौऱ्यावर आहेत. यावेळी अमित शाह यांनी नरेंद्र मोदी यांच्यानंतर देशाचा नवा पंतप्रधान कसा असावा, याबाबत मोठे विधान केले आहे.
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी नव्या संसद भवनात सेंगोलची स्थापना केली. त्याबद्दल त्यांना धन्यवाद देण्यासाठी तामिळनाडूतून रालोआच्या ३० सहकाऱ्यांना संसदेत पाठवा, असे आवाहन केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांनी केले. मोदी सरकारला नऊ वर्षे पूर्ण झाल्यानिमित्त तामिळनाडूतील वेल्लूर येथे आयोजित जाहीर सभेला संबोधित करत होते. दक्षिण चेन्नईतील भाजप पदाधिकाऱ्यांच्या बंद दाराआड झालेल्या बैठकीत अमित शाह यांनी मोठे वक्तव्य केले आहे. तामिळनाडूतील दोन संभाव्य पंतप्रधान कामराज आणि मूपनार यांची संधी गमावली. त्यांना पंतप्रधान पदापर्यंत न पोहचू देण्यासाठी डीएमके जबाबदार असल्याचा आरोप अमित शाह यांनी केली.
पंतप्रधान पदाबाबत केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांचे मोठे विधान
गरीब कुटुंबातील तमिळ व्यक्तीने भारताचा पंतप्रधान व्हायला हवे, असे अमित शाह यांनी म्हटले आहे. आगामी लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर तामिळनाडूच्या दोन दिवसीय दौऱ्यावर अमित शाह गेले होते. चेन्नईमध्ये पक्षाच्या कार्यकर्त्यांच्या बंद दरवाजाच्या बैठकीत बोलत असताना त्यांनी हे वक्तव्य केल्याचे बोलले जात आहे.
दरम्यान, तुम्हीच सांगा, काश्मीरचे कलम ३७० हटवायला हवे होते की नाही, काश्मीर आमचे आहे की नाही; पण काँग्रेस आणि द्रमुकचा विरोध होता. हे काँग्रेस आणि द्रमुक हे दोन्ही २ जी, ३ जी आणि ४ जी पक्ष आहेत. मदुराईत एम्स का बांधले नाही, हे तुम्ही लोकांनी विचारावे. द्रमुकने याचे जनतेला उत्तर द्यावे, अशी टीका अमित शाह यांनी केली.