महाविकास आघाडीतील जागावाटपावर उध्दव ठाकरे यांनी जाहीर केली भूमिका

0

मुंबई,दि.30: महाविकास आघाडीतील जागावाटपावर उध्दव ठाकरे यांनी भूमिका जाहीर केली आहे. अजित पवार यांच्या गटातील पिंपरी चिंचवड महानगरपालिकेचे माजी महापौर संजोग वाघेरे ह्यांनी त्यांच्या कार्यकर्त्यांसह शिवसेना (उबाठा) पक्षात प्रवेश केला. यानंतर उद्धव ठाकरे यांनी पत्रकार परिषद घेतली. या वेळी ते बोलत होते. ठाकरे यांनी लोकसभेसाठी जागावाटप, राममंदिर, मुंबईतील प्रश्नांवर यावेळी भाष्य केले.

जागावाटपावरून महाविकास आघाडीत धुसफूस सुरू झाली आहे. शिवसेना नेते संजय राऊत यांनी 23 जागांवर दावा सांगितला आहे. जागावाटपावर उद्धव ठाकरे यांनी आपली भूमिका स्पष्ट केली आहे. “आमच्या महाविकास आघाडीमध्ये जागावाटप सुरळीत होईल. याबाबतीत आमची बैठक होईल. वंचितसोबत आमची बोलणी सुरु आहेत. मविआ आणि वंचित अशी संयुक्त बैठक करण्याचा आमचा प्रयत्न आहे. मी आघाडीत बिघाडी होऊ देणार नाही. कॉंग्रेसच्या प्रमुख नेत्यांशी जोपर्यंत आम्ही बोलत नाही, तोपर्यंत आमच्यापैकी कुणीही यावर काही बोलणार नाही,” अशी माहिती उद्धव ठाकरेंनी दिली आहे.

ठाकरे म्हणाले, आम्ही जागावाटपाबाबत लवकरच निर्णय घेणार आहोत. काँग्रेसकडूनही अद्याप कोणताही फॉर्म्युला आलेला नाही. राष्ट्रवादी काँग्रेस सोबत जागावाटपाचा प्रश्न सुटलाय. देश वाचवायचा, लोकशाही वाचवायची आहे. यासाठी महाविकास आघाडीतील सर्व पक्ष एकत्र येत आहेत, असे उद्धव ठाकरे यांनी स्पष्ट केली आहे. मुंबईत भ्रष्टाचाराची फार घाण झालेली आहे, ती साफ करायची आहे, असा टोलाही मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना लगावला. 

“वंचित बहुजन आघाडीसोबत आमची बोलणी सुरू आहेत. पुढील दोन दिवसांमध्ये संजय राऊत यांच्यासह शिवसेनेचे दोन नेते आणि वंचितचे नेते एकत्र बैठक घेतील. वंचित आघाडीचे प्रमुख प्रकाश आंबेडकर आणि मी प्रत्यक्ष भेटल्यानंतर जागावाटपावर चर्चा करू,” असं उद्धव ठाकरेंनी म्हटलं आहे. तसंच वंचितकडून होत असल्याच्या 12 जागांच्या मागणीवरही उद्धव ठाकरे यांनी प्रतिक्रिया दिली आहे. हा फॉर्म्युला अद्याप माझ्यासमोर आलेला नाही, असं ते म्हणाले.

प्रकाश आंबेडकरांचा फॉर्म्युला

वंचित बहुजन आघाडीचे प्रमुख प्रकाश आंबेडकर यांनी नुकतंच जागावाटपाच्या मुद्द्यावर उद्धव ठाकरे आणि राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांना पत्र लिहिलं आहे. या पत्राद्वारे आंबेडकर यांनी चारही पक्षांनी लोकसभेच्या प्रत्येकी 12 जागा लढवाव्यात, असा प्रस्ताव मांडला आहे.

राम मंदिराच्या लोकार्पणासाठी मला निमंत्रण आलेलं नाही. अयोध्येत राम मंदिर होतय ही आनंदाची गोष्ट आहे. शिवसेनेचं राम मंदिरासाठी मोठ योगदान आहे. शिवसेनाचा मोठा संघर्ष आहे. शिवसेना प्रमुख बाळासाहेब ठाकरे यांचा मतदानाचा अधिकार राम मंदिरासाठी लढा दिल्यामुळे हेरावून घेण्यात आला होता. शिवसेनेने राममंदिरासाठी पक्षनिधीतून योगदान दिले होते. मी यापूर्वी दोनदा अयोध्येत गेलोय, असे उद्धव ठाकरे स्पष्ट केले. राम मंदिराचा पॉलिटिकल इव्हेंट होऊ नये, अशी माझी इच्छा होती. देवेंद्र फडणवीस बाबरी मशीदीच्या घुमटावर चढले असतील आणि त्यांच्या वजनामुळे बाबरी पडली, असेल असा उपासाहत्मक टोलाही ठाकरे यांनी लगावला.


LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here