ज्या नेत्यांवर 24 तासात तुरुंगात जातील असे आरोप होत होते ते भाजपात गेल्यावर स्वच्छ झाले: उद्धव ठाकरे

0

मुंबई,दि.27: माजी मुख्यमंत्री आणि शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे (Uddhav Thackeray) यांच्या संजय राऊत (Sanjay Raut) यांनी घेतलेल्या मुलाखतीचा दुसरा भाग आज प्रसारीत झाला आहे. शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी भाजपावर आधी शिवसेना नेत्यांवर आरोप केल्याचा आणि नंतर त्याच नेत्यांना आपल्यासोबत घेऊन पुण्यवान केल्याचा आरोप केला आहे. यावेळी त्यांनी केंद्रीय मंत्री व भाजपा नेते नितीन गडकरींचा उल्लेख केला. गडकरी म्हणाले होते की आमच्याकडे वॉशिंग मशिन आहे, असं म्हणत ठाकरेंनी भाजपाला टोला लगावला. ते बुधवारी (27 जुलै) सामनाचे कार्यकारी संपादक संजय राऊत यांनी घेतलेल्या मुलाखतीत बोलत होते.

उद्धव ठाकरे म्हणाले, “नितीन गडकरी म्हणाले होते की, ‘आमच्याकडे वॉशिंग मशिन आहे. लोकांना आमच्या पक्षात घेऊन आम्ही पुण्यवान करतो.’ आरोप असणारे त्यांच्या पक्षात गेल्यावर त्यांचं पुढे काय होणार आहे? शिवसेनेच्या ज्या नेत्यांवर 24 तासात तुरुंगात जातील असे आरोप होत होते ते भाजपात गेल्यावर स्वच्छ झाले. नवनव्या लोकांना त्रास दिला जातोय. हे सशक्त राज्यकर्त्याचं लक्षण नाही.”

तुम्हालाही अटक होईल

यावेळी उद्धव ठाकरेंनी संजय राऊत यांना तुरुंगात जाण्याच्या मिळणाऱ्या इशाऱ्यांवरही भाष्य केलं. “तुमच्यावर आरोप होत आहेत. तुम्हालाही अटक केलं जाईल असं वातावरण निर्माण केलं जातंय. याला काय म्हणायचं? असं होऊनही तुम्ही हटत नाही. तुम्ही आत्ता जरी गेले तरी तुम्ही पुण्यवान व्हाल. सगळे पुण्यात्मे तिकडे जातील,” असं मत उद्धव ठाकरेंनी व्यक्त केलं.

“बाळासाहेब ठाकरे सांगायचे तो आपल्या कर्माने मरणार आहे त्याला धर्माने मारू नका. शेवटी प्रत्येकाच्या पापाचा घडा भरत असतो,” असंही त्यांनी नमूद केलं.

उद्धव ठाकरे पुढे म्हणाले, “विरोधकांना दडपशाहीविरोधात लढण्यासाठी इच्छाशक्ती फार महत्त्वाची आहे. आणीबाणीच्या काळात आपल्या देशाने अनुभव घेतला होता. त्यावेळी जनता पक्ष स्थापन झाला. जनता पक्षाकडे देशभरात प्रत्येक मतदान केंद्रावर पोलिंग एजंट देखील नव्हते, तरी देखील लोकांनी भरभरून मतं दिली. त्यावेळी साहित्यिकांसह सर्वच स्तरातील लोकांनी बाहेर पडून आवाज उठवला. जनता पक्ष सत्तेवर आला आणि आपआपसात भांडून स्वतःचं सरकार स्वतःच पाडून टाकलं. त्यामुळे इच्छाशक्ती पाहिजे.”

“एकत्र यायचं झालं तर कुणीही पदांवरून भांडणार नाही असं ठरवलं पाहिजे. आत्ता यांनी हुकुमशाहीच आणली आहे, असं मी म्हणत नाही. मात्र, ज्या दिशेने पावलं पडत आहेत ती बरी नाहीत, असं अनेकजणांचं मत आहे,” असं उद्धव ठाकरे यांनी म्हटलं.

दडपशाहीवर बोलताना उद्धव ठाकरे म्हणाले, “माझ्याकडे दडपशाहीविरोधात लढण्याची इच्छाशक्ती आहेच. मात्र, प्रश्न माझ्या एकट्याचा नाही. देशातील सर्व राज्यांनी एकत्र व्हायला हवं. भाजपाने देखील अधिक शत्रू न वाढवता. आरोग्यदायी राजकारण केलं पाहिजे. आम्ही तर मित्रच होतो, 25-30 वर्षे सोबतीच होतो, तरी 2014 मध्ये त्यांनी युती तोडली होती. कारणं काहीच नव्हती. तेव्हाही आपण हिंदुत्व सोडलेलं नव्हतं आणि आजही सोडलेलं नाही.”


LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here