सिल्लोड,दि.15: शिवसेना (UBT) पक्षप्रमुख उध्दव ठाकरे यांनी भाजपाचा उल्लेख करत मोठे वक्तव्य केले आहे. सिल्लोड येथील प्रचारसभेत ते बोलत होते. मराठवाडा, विदर्भ, उत्तर महाराष्ट्र जिथे जातोय तिथे सगळ्यांची एकच ओरड आहे की सोयाबीनला भाव नाही, कापसाला भाव नाही. शेतकऱ्यांच्या मालाला हमीभाव नाही. मिंधे, गद्दारांना 50 खोके मिळत असतील तर राब राब राबणाऱ्या शेतकऱ्यांच्या हक्काचे का मिळू नये? असा सवाल ठाकरे यांनी केला.
तुमचे आमचे मतभेद असतील. त्याच्यासाठी माझ्याशी कुणी बोलायला तयार असेल तर मीही बोलायला तयार आहे. पण आता आपण सगळे मिळून सिल्लोडला लागलेला कलंक धुवून टाकू. ही संधी आहे अशी साद उद्धव ठाकरे यांनी भाजपा आणि त्यांच्या कार्यकर्त्यांना घातली आहे. त्यांनी अब्दुल सत्तार यांच्याविरोधात सगळ्यांना एकत्र येण्याचं आवाहन केले आहे.
सिल्लोड मतदारसंघाचे महाविकास आघाडीचे अधिकृत उमेदवार सुरेश बनकर यांच्या प्रचारासाठी शुक्रवारी शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांची सिल्लोडमध्ये सभा झाली. यावेळी त्यांनी आमदार अब्दुल सत्तारसह मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, भाजपा आणि मोदी-शाह यांच्यावर टीका केली.
महाविकास आघाडीचे सरकार असताना सोयाबीनला 7 हजार रुपये भाव होता. आता 4-5 हजार रुपये भाव मिळत असून सरकार आल्यावर 7 हजार रुपये भाव दिल्याशिवाय राहणार नाही, असा विश्वास उद्धव ठाकरे यांनी शेतकऱ्यांना दिला. शेतकऱ्यांच्या शेतमालाला हमीभाव नाही तर गद्दाराला हमीभाव द्यायचा का? गद्दाराला 50 खोके मिळत असतील तर राब राब राबणाऱ्या शेतकऱ्यांना, शेतमजुरांना हक्काचे का मिळू नये? असा सवाल उद्धव ठाकरे यांनी केला.