उद्धव ठाकरे यांनी सांगितले विश्वासदर्शक ठरावाला सामोरे न जाण्याचे कारण

0

मुंबई,दि.27: माजी मुख्यमंत्री आणि शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे (Uddhav Thackeray) यांच्या संजय राऊत (Sanjay Raut) यांनी घेतलेल्या मुलाखतीचा दुसरा भाग आज प्रसारीत झाला आहे. या भागात बंडखोरांसह केंद्र सरकार, भाजपवर ठाकरेंनी थेट निशाणा साधला आहे. तसेच शिवसेनेचा मुख्यमंत्री पुन्हा होईल, विधानसभा निवडणुका होऊ द्या; मग दाखवतोच! अशा शब्दात उद्धव ठाकरेंनी इशारा दिला आहे.

माझ्या एकाही माणसाने सभागृहात माझ्याविरोधात मत व्यक्त केलं असतं तर ते माझ्यासाठी लज्जास्पद ठरलं असतं, असं सांगत शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरेंनी यामुळेच आपण विश्वासदर्शक ठरावाला सामोरे न गेल्याचं स्पष्ट केलं. त्यांनी येऊन नीट सांगितलं असतं तर मी सन्मानाने केलं असतं असंही ते म्हणाले. एकनाथ शिंदेंसहित पक्षातील आमदार आणि खासदारांनी बंड पुकारल्यानंतर उद्धव ठाकरे यांनी मुलाखतीच्या माध्यमातून आपली भूमिका मांडली आहे. सामनाचे कार्यकारी संपादक संजय राऊत यांनी ही मुलाखत घेतली असून यावेळी उद्धव ठाकरे यांनी बंडखोरांसोबतच, राज्यातील सत्तांतर यासह अनेक मुद्द्यांवर भाष्य केलं.

विश्वासादर्शक ठरावाला सामोरे गेला असतात तर फुटीर गट अजून उघडा पडला असता असं सांगितलं असता उद्धव ठाकरे म्हणाले “तो पडलाच ना, अध्यक्षांच्या निवडणुकीत पडला, त्यानंतरही पडला आणि पडतच चालला आहे. निवडणूक आयोगाला जे पत्र दिलं आहे त्यातही शिस्तभंगाच्या कारवाईचा उल्लेख आहे. मी नेहमी म्हणतो की, हल्ली लोकशाहीमध्ये डोकं वापरण्यापेक्षा ते मोजण्यासाठीच जास्त उपयोग होत आहे”.

“मला सातत्याने काँग्रेस धोका देणार असं भासवलं जात होतं. शरद पवारांची तशी ओळखच आहे असं ते म्हणत होते. पण माझ्या लोकांनीच मला दगा दिला,” अशी खंत उद्धव ठाकरेंनी व्यक्त केली.

उद्धव ठाकरे यांनी म्हटलं की, मुंबई महापालिकेविषयी शंका निर्माण करण्यात येत आहे आणि शिवसेनेचा पराभव करू अशा वल्गना सुरू आहेत. याच्या पूर्वी अनेकांनी म्हटलंय की, ‘शिवसेना’ या निवडणुकीनंतर राहणार नाही वगैरे! मुंबईत आता मुंबईकर म्हणून सगळे एकत्र आलेत. त्यावेळी त्यांनी हिंदूंमध्ये फूट पाडण्याचा प्रयत्न केला की, हे मराठी ते अमराठी वगैरे, पण आता ही सगळी मंडळी मला येऊन भेटताहेत. मराठी, अमराठी अशी फूट पाडण्याचा प्रयत्न आजसुद्धा सुरू आहे. पण आता याला कोणी बळी पडणार नाही. मराठी माणसं एकवटली आहेत. तमाम मुंबईकर आज निवडणुकांची वाट बघतोय आणि माझं मत असं आहे की, मुंबईच्याच नव्हे, तर राज्याच्या विधानसभेच्या निवडणुकाही व्हायला हव्यात.

शिवसेनेचा मुख्यमंत्री परत होईल? असा सवाल ठाकरे यांना संजय राऊतांनी विचारला असता ते म्हणाले की, का नाही होणार? आणि तो जर करायचा नसेल तर माझ्या लढाईला काय अर्थ आहे. माझं जे शिवसेनाप्रमुखांना वचन आहे ते आजही कायम आहे. मी तर शिवसेनेचाच आहे. मी पक्षप्रमुख आहे. पण माझा हेतू तो नव्हता. मी मुख्यमंत्री होणार असे मी बोललो नव्हतो आणि वचन पूर्ण केल्यानंतरसुद्धा मी काय दुकान बंद करून बसेन? शिवसेना मला वाढवायची आहे आणि ती जर का वाढवण्याचा प्रयत्न मी सोडणार असेन तर मी कशाला पक्षप्रमुख? असंही ते म्हणाले. उद्धव ठाकरे यांनी म्हटलं आहे की, ज्यांना मी आपले मानले , तीच माणसं सोडून गेली . म्हणजेच ती माणसं कधीच आपली नव्हती . त्यांच्याबद्दल वाईट वाटण्याचे कारण नाही. भाजपात आज बाहेरून आलेल्यांनाच सर्वकाही दिलं जातंय. महाविकास आघाडीचा प्रयोग चुकला नाही . लोकांनी स्वागतच केले. ‘ वर्षा ‘ सोडून जाताना महाराष्ट्रात अनेकांनी अश्रू ढाळले. कोणत्या मुख्यमंत्र्यांना असे प्रेम मिळाले ? त्या अश्रूंचे मोल मी वाया जाऊ देणार नाही !” असं ठाकरे यांनी म्हटलं आहे.


LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here