Home महाराष्ट्र ‘जेव्हा सत्तेचा माज चढतो, तेव्हा…’ उदय सामंत यांची जयकुमार गोरे यांच्यावर टीका

‘जेव्हा सत्तेचा माज चढतो, तेव्हा…’ उदय सामंत यांची जयकुमार गोरे यांच्यावर टीका

0
Uday Samant-Jaykumar Gore

सोलापूर,दि.२०: लोकशाहीमध्ये कोणत्याही सर्वसामान्य किंवा अपक्ष उमेदवाराला कमी लेखणे किंवा हिणवणे योग्य नाही. जेव्हा सत्तेचा अतिरेक आणि अहंकार डोक्यात शिरतो, तेव्हा ‘गोकुळ’ दूध संघासारखे निकाल लागतात, अशा शब्दांत उद्योगमंत्री उदय सामंत (Uday Samant) यांनी भाजप नेते आणि मंत्री जयकुमार गोरे यांना खडेबोल सुनावले आहेत. पुणे शिक्षक मतदारसंघातील निवडणुकीच्या प्रचारादरम्यान सोलापुारात बोलताना त्यांनी हा घणाघात केला.

काही दिवसांपूर्वी भाजप नेते जयकुमार गोरे यांनी शिंदेसेनेचे उमेदवार सचिन सानप यांच्याबाबत बोलताना, “कोण सचिन सानप? मी त्यांना ओळखत नाही,” असे वादग्रस्त विधान केले होते. गोरे यांच्या याच वक्तव्याचा समाचार घेत उदय सामंत यांनी भाजपला महायुतीचा धर्म पाळण्याचा सल्ला दिला.

काय म्हणाले उदय सामंत?

पुणे शिक्षक मतदारसंघातील निवडणूक ही कोणतीही भारत-पाकिस्तानची लढाई नसून ती एक मैत्रीपूर्ण लढत आहे. यामध्ये कोणालाही कमी लेखण्याचे कारण नाही. सत्तेचा अहंकार बाळगल्यास मतदार कसा धडा शिकवतात, याचे जिवंत उदाहरण नुकत्याच झालेल्या ‘गोकुळ’च्या निकालाने दाखवून दिले आहे. “मी सांगतो तेच अंतिम आणि मी बोलेन तेच खरं,” अशी भावना जेव्हा नेत्यांमध्ये निर्माण होते, तेव्हा गोकुळसारखे राजकीय भूकंप घडतात, असा इशाराही सामंतांनी दिला.

तसेच, सचिन सानप यांना ओळखत नाही असे म्हणणाऱ्या जयकुमार गोरेंना टोला लगावत सामंत म्हणाले की, “आज तुम्ही त्यांना ओळखत नसाल, पण येत्या २७ तारखेला जेव्हा सचिन सानप आमदार म्हणून विजयी होऊन विधान परिषदेत जातील, तेव्हा ते कोण आहेत हे तुम्हाला नक्कीच कळेल.” महायुतीत एकत्र काम करत असताना नेत्यांनी एकमेकांचा मानसन्मान राखला पाहिजे आणि कोणाचेही मन दुखावले जाणार नाही याची काळजी घेतली पाहिजे, असेही त्यांनी स्पष्ट केले.

‘गोकुळ’ निवडणुकीत महायुतीला बसला होता दणका

कोल्हापूरच्या गोकुळ दूध संघाच्या निवडणुकीत काँग्रेस नेते सतेज पाटील यांच्या नेतृत्वाखालील राजर्षी शाहू शेतकरी समविचारी आघाडीने महायुतीच्या पॅनेलला पराभवाची धूळ चारली होती. महायुतीच्या नेत्यांनी २५ पैकी २५ जागा जिंकण्याचा दावा केला होता, मात्र प्रत्यक्षात सतेज पाटील यांनी उलटफेर करत १३ जागांवर दणदणीत विजय मिळवला होता. हाच धागा पकडत आता सत्ताधारी पक्षातील मंत्री उदय सामंतांनीच भाजप नेत्यांच्या अहंकारावर बोट ठेवल्याने राजकीय वर्तुळात जोरदार चर्चा रंगली आहे.


LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

कॉपी करू नका.