Uday Lalit: नवोदित वकिलांनी अडथळ्यांच्या शर्यतीला घाबरू नये: सरन्यायाधीश उदय लळित

0

सोलापूर,दि.16: Uday Lalit: माझ्या वकिली व्यवसायामध्ये कुटुंब, मित्र, सोलापूरकराचे योगदान आहे. तरूण नवोदित वकिलांनी पॅशन म्हणून वकिली करावी. या व्यवसायात सुरूवातीला अनंत अडथळे येतात, ठेचा बसतात या अडथळ्यांच्या शर्यतीला घाबरू नका, पुढे चालत रहा, असे आवाहन देशाच्या सर्वोच्च न्यायालयाचे सरन्यायाधीश उदय लळित (CJI Uday Lalit) यांनी केले.

महाराष्ट्र, गोवा बार कौन्सिलच्या वतीने हुतात्मा स्मृती मंदिरात आयोजित राज्यस्तरीय वकील परिषदेत सरन्यायाधीश उदय लळित (Uday Lalit) बोलत होते. यावेळी सोलापूरचे सुपूत्र देशाच्या सर्वोच्च न्यायालयाचे सरन्यायाधीश म्हणून त्यांनी शपथ घेतल्याने त्यांचा सोलापूरकरांच्या वतीने मानपत्र, स्मृतीचिन्ह देवून सन्मान करण्यात आला. यावेळी देशाचे माजी गृहमंत्री सुशीलकुमार शिंदे, मुंबई उच्च न्यायालयाचे मुख्य न्यायाधीश दीपांकूर दत्ता, सोलापूरचे रहिवासी असलेले न्यायाधीश एम. एस. कर्णिक, एन. जे. जमादार, विनय जोशी, राज्याचे महाधिवक्ता ॲड. आशुतोष कुंभकोणी, प्रमुख जिल्हा व सत्र न्यायाधीश डॉ. शब्बीर अहमद औटी, जिल्हाधिकारी मिलिंद शंभरकर, पोलीस आयुक्त राजेंद्र माने, पोलीस अधीक्षक तेजस्वी सातपुते, महाराष्ट्र-गोवा बार कौन्सिलचे अध्यक्ष ॲड. मिलिंद थोबडे आदी उपस्थित होते.

सरन्यायाधीश उदय लळित यांनी सोलापूर ही माझी जन्मभूमी आहे. याठिकाणी माझे शालेय शिक्षण झाले. जन्मगावाचे ऋणानुबंध कायम आहेत, इथले दोस्त, वर्गमित्र यांच्याशी आजही संपर्कात आहे. मी 39 वर्षे वकिली व्यवसायात आहे. मला वकिली व्यवसातून उदंड किर्ती, मान, पैसा सर्व मिळाले. आता सामाजिक बांधिलकीतून समाजासाठी जे आहे ते परत करायचे आहे. वकिलांनी मूल्यांची शिदोरी घेऊन स्वत:वर विश्वास ठेवून मार्गक्रमण करावे, अडथळे पार होतील. आज निम्म्याहून जास्त युवांची संख्या देशात आहे. येणाऱ्या काळात युवकांच्या हातात देश असेल.

ग्रंथालय आणि पुस्तकांचा आधार घेवूनच आम्ही शिखर गाठले, सध्या इंटरनेटच्या जमान्यात तुम्हाला संशोधन, अभ्यासासाठी प्रचंड साधने आहेत. युट्यूबसुद्धा तुम्हाला वकिलांचा युक्तीवाद पाहायला मिळेल, सदैव सचोटीने काम करा, कक्षा भव्य आहेत, असेही सरन्यायाधीश लळित यांनी सांगितले.

सोलापूरचे चार रत्न-सुशीलकुमार शिंदे

माजी केंद्रीय मंत्री सुशीलकुमार शिंदे म्हणाले, वकिलांनी न्यायालयात न घाबरता वादविवाद करून सामान्य नागरिकांना न्याय द्यावा. सोलापूरच्या मातीतल्या माणसाने न्यायव्यवस्थेत आपला ठसा उमटवल्याने सोलापूरकरांचा उर भरून येतो. चार हुतात्मा यांच्या पद्धतीने सोलापूरचे चार रत्न…उदय लळित, विनय जोशी, एन.जे. जमादार आणि आशितोष कुंभकोणी आहेत. सर्वांनी सामाजिक न्यायासाठी योगदान द्यावे. बार कौन्सिलमधून खेड्यातील, मागास समाजातील वकिलांनी मदत करावी. जिल्ह्यातून आणखी एक मुख्य न्यायाधीश तयार व्हावा, अशी अपेक्षा त्यांनी केली.

पैशासाठी वकिली करू नका-आशितोष कुंभकोणी

सोलापूरचा माणूस न्याय व्यवस्थेच्या मुख्य स्थानावर पोहोचला, याबाबत नितांत अभिमान आहे. विनम्र स्वभाव, संयमी वृत्तीचे, कोणालाही अपशब्द न बोलणारे, चौकटीबाहेर विचार करणारे सरन्यायाधीश लळित आहेत. त्यांचे गुण नवोदित वकिलांनी घ्यावेत. नवोदितांनी पैशासाठी वकिली करू नये, पैशाकडे लक्ष न देता सर्वसामान्यांना न्याय देण्याचे काम करा, असे आवाहन कुंभकोणी यांनी केले.


LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here