सोलापूर,दि.8: दिगंबर बन्ने खून प्रकरणी दोघांना न्यायालयाने जामीन मंजूर केला आहे. बाळे ता. उत्तर सोलापूर येथील जमीनीच्या वादातून पुरषोत्तम दिगंबर बन्ने रा. पत्रा तालीम, सोलापूर याचा खून केल्याप्रकरणी अटकेत असलेले अमित उर्फ पप्पू आप्पासाहेब आडके व महादेव सदाशिव धबाले दोघे रा. सोलापूर यांचा जामीनअर्ज जिल्हा व सत्र न्यायाधीश सोलापूर खुणे यांनी मंजूर केला.
यात थोडक्यात हकीकत अशी की, दिनांक २१/०६/२०२४ रोजी दुपारी १२:४० वाजण्याच्या सुमारास बाळे तालुका उत्तर सोलापूर येथील गट नंबर ४१ /३ या शेतामध्ये यातील फिर्यादी देविदास दिगंबर बन्ने आणि मयत पुरुषोत्तम बन्ने हे त्यांच्या शेतीची शासकीय मोजणी करण्याकरता त्यांच्या शेतामध्ये शासकीय कर्मचाऱ्यांना व इतर खाजगी व्यक्तींना घेऊन गेले असता त्या ठिकाणी आरोपी शांतप्पा आडके, सागर आडके, विजयकुमार उर्फ बाळू आडके, अमित उर्फ पप्पू आप्पासाहेब आडके, महादेव सदाशिव धबाले, अजित आडके यांनी त्यांच्यातील शेतीच्या वादातील राग मनात धरून ही शेती आमची आहे मोजणी करायची नाही नाहीतर एकेकाला सोडणार नाही या हरामखोरांना संपवू असे म्हणत सर्व आरोपींनी एकत्रित येऊन त्यांच्या हातातील लोखंडी कोयता, लोखंडी पाईपने पुरुषोत्तम बन्ने याच्या डोक्यात दोन्ही हातापायावर, कमरेवर, शरीरावर वार करून गंभीर जखमी केले.
तसेच फिर्यादी देविदास बन्ने याला देखील सदर आरोपींनी लोखंडी पाईपने उजव्या खांद्यावर आणि पायाच्या पिंडीवर मारहाण करून जखमी करून त्याचा खून करण्याचा प्रयत्न केला. तदनंतर पुरुषोत्तम बन्ने हा गंभीर जखमी झाल्याने त्याला उपचार करता सिद्धेश्वर हॉस्पिटल तसेच वळसंगकर हॉस्पिटल या ठिकाणी दाखल केले होते. तदनंतर फिर्यादीने फौजदार चावडी पोलीस ठाण्यात फिर्याद दिली असता पोलिसांनी सर्व आरोपींच्या विरुद्ध भादवी कलम ३०७ व इतर कलमान्वये गुन्हा दाखल केला होता. तदनंतर दिनांक २३/०६/२०२४ रोजी यातील जखमी असताना पुरुषोत्तम बन्ने हा उपचार घेत असता मयत झाला त्यामुळे पोलिसांनी सदर आरोपींच्या विरुद्ध ३०२ प्रमाणे गुन्हा दाखल करून आरोपींना अटक केली.
आरोपी शांतप्पा आडके, सागर आडके, विजयकुमार उर्फ बाळू आडके, महादेव धबाले, अमित उर्फ पप्पू आडके यांची तपासासाठी पोलीस कोठडी घेऊन नंतर न्यायालयीन कोठडीत रवानगी करण्यात आली.
तदनंतर सदर आरोपींपैकी आरोपी महादेव धबाले व अमित आडके यांना जामीन मिळावा म्हणून अॅड. संतोष न्हावकर यांच्यामाफत न्यायालयात अर्ज दाखल केला होता. यातील आरोपींच्या जामीन अर्जावर युक्तिवाद करताना सदर दोन्ही आरोपी हे घटनेवेळी घटनास्थळी हजर नव्हते, फिर्यादीने त्यांची नावे फिर्यादीत न सांगता उशिराने सांगितली आहेत. त्यामुळे केवळ संशयातून आरोपींना खोट्या गुन्ह्यात अडकवले असल्याचे न्यायालयाचे निदर्शनास आणून दिले.
सदरचा युक्तिवाद ग्राह्य धरून न्यायालयाने आरोपींचा जामिनाचा अर्ज मंजूर केला. यात आरोपींच्या वतीने ॲड. संतोष न्हावकर, ॲड. शाहनवाज शेख, अॅड. राहुल रुपनर, अॅड. शैलेश पोटफोडे यांनी तर सरकार पक्षातर्फे अॅड..माधुरी देशपांडे यांनी काम पाहिले.