सोलापूर,दि.13: आरोग्य व वैद्यकीय क्षेत्रामध्ये कोविड-19 या साथीच्या रोगाशी संबंधित उद्भवलेल्या परिस्थितीत ऑक्सिजन प्लॅन्ट या क्षेत्रात कुशल मनुष्यबळाची कमतरता भासत आहे. या क्षेत्रातील संसाधनांमधील आवश्यक मनुष्यबळाचा तुटवडा दूर करण्यासाठी ऑक्सिजन प्लॅन्ट उपलब्ध असणाऱ्या यंत्रणांच्या पायाभूत सुविधांचा वापर करुन त्याच ठिकाणी कुशल मनुष्यबळ तयार करण्यासाठी जिल्ह्यामध्ये मुख्यमंत्री महाआरोग्य कौशल्य विकास प्रशिक्षण कार्यक्रम राबविण्यात येणार असल्याची माहिती कौशल्य विकास, रोजगार व उद्योजकताचे सहायक आयुक्त सचिन जाधव यांनी दिली.
या कार्यक्रमाच्या माध्यमातून आरोग्य क्षेत्रात काम करण्यास इच्छुक असलेल्या जिल्ह्यातील 18 ते 45 वयोगटातील युवक-युवतींना प्रशिक्षण पूर्णपणे नि:शुल्क दिले जाणार आहे. प्रशिक्षण घेण्यास इच्छूक उमेदवारांनी https://tinyurl.com/snusfe2k या लिंकवर उपलब्ध असणाऱ्या गुगल फॉर्मच्या माध्यमातून आपली माहिती भरावी.
अधिक माहितीसाठी जिल्हा कौशल्य विकास, रोजगार व उद्योजकता मार्गदर्शन केंद्र, महाराष्ट्र राज्य तांत्रिक प्रशाला परिसर, नॉर्थकोट पार्क चौक, सोलापूर येथे प्रत्यक्ष अथवा या कार्यालयाचे दुरध्वनी क्र. 0217-2950956 वर संपर्क साधावा, असे आवाहन श्री. जाधव यांनी केले आहे.