Top CM Survey 2022: सर्वोत्तम कामगिरी करणाऱ्या टॉप ५ मुख्यमंत्र्यांमध्ये उद्धव ठाकरे यांचा समावेश

0

दि.२१: Top CM Survey 2022: इंडिया टुडे आणि सी वोटरने केलेल्या सर्वेमध्ये (India Today C Voter Survey) महाराष्ट्राचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे (Maharashtra Chief Minister Uddhav Thackeray) यांचा सर्वोत्तम कामगिरी करणाऱ्या टॉप ५ मुख्यमंत्र्यांनी मध्ये समावेश आहे. इंडिया टुडे सी वोटर सर्वेतून ही मोठी माहिती समोर आली आहे. इंडिया टुडे माध्यम समूहानं केलेल्या सर्वेक्षणात उद्धव ठाकरे चौथ्या क्रमांकावर आहेत. विशेष म्हणजे या सर्वेक्षणात भाजपाच्या एकाही मुख्यमंत्र्यांचा समावेश नाही.

आगामी विधानसभा निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर इंडिया टुडे आणि सी वोटरने ‘मूड ऑफ द नेशन’ या आधारवर सर्वे केला. इंडिया टुडेनं प्रत्येक राज्यातील लोकांना त्यांच्या मुख्यमंत्र्यांची कामगिरी कशी आहे याबद्दल विचारणा केली. ४३ टक्क्यांहून अधिक मतं मिळालेल्या ९ मुख्यमंत्र्यांची यादी प्रसिद्ध करण्यात आली. या यादीत ओडिसाचे मुख्यमंत्री नवीन पटनायक प्रथम क्रमांकावर आहेत. पटनायक यांच्या कामावर ७१.१ टक्के लोकांनी समाधान व्यक्त केलं आहे.

लोकप्रिय मुख्यमंत्र्यांच्या यादीत पटनायक यांच्यानंतर पश्चिम बंगालच्या मुख्यमंत्री ममता बॅनर्जी यांचा क्रमांक लागतो. त्यांच्या कामगिरीवर ६९.९ टक्के जनता समाधानी आहे. तिसऱ्या नंबरवर तमिळनाडूचे मुख्यमंत्री एम. के. स्टॅलिन आहेत. त्यांच्या कारभारावर ६७.५ टक्के लोकांनी समाधान व्यक्त केलं. यानंतर महाराष्ट्राचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांचा क्रमांक लागतो. ६१.८ टक्के लोक त्यांच्या कामकाजावर समाधानी आहेत.

केरळचे मुख्यमंत्री (६१.६ टक्के) यादीत पाचव्या, तर दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल (५७.९ टक्के) सहाव्या स्थानी आहेत. ९ मुख्यमंत्र्यांच्या यादीत भाजपचे केवळ एक मुख्यमंत्री आहेत. हेमंत बिस्वा सरमा सातव्या क्रमांकावर आहेत. आसाममधील ५६.६ टक्के जनतेनं त्यांच्या कामगिरीवर समाधान व्यक्त केलं. यानंतर छत्तीसगडचे मुख्यमंत्री भूपेश बघेल (५१.४ टक्के), राजस्थानचे मुख्यमंत्री अशोक गेहलोत (४४.९ टक्के) यांचा क्रमांक लागतो.


LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here