कोविड-19 परिस्थितीचा आढावा घेण्यासाठी आज पंतप्रधान नरेंद्र मोदी मुख्यमंत्र्यांशी साधणार संवाद

0

नवी दिल्ली,दि.27: पंतप्रधान नरेंद्र मोदी (PM Narendra Modi) आज, दि. 27 एप्रिल, 2022 रोजी दुपारी 12.00 वाजता देशातील कोविड-19 (Covid -19) परिस्थितीचा आढावा घेण्यासाठी राज्यांच्या मुख्यमंत्र्यांशी संवाद साधणार आहेत. दोन आठवड्यांमध्ये देशातील कोरोना रुग्णांची संख्या पुन्हा वाढत असल्याचं चित्र दिसत आहे. देशाची राजधानी असणाऱ्या दिल्लीमध्ये (Delhi) मागील काही दिवसांमध्ये दिवसाला एक हजारहून अधिक रुग्ण आढळून आलेत. मुंबईमध्ये (Mumbai) रविवारी विक्रमी 144 रुग्ण आढळून आले.

मुंबईतही कोरोना (Corona) रुग्णांची संख्या वाढत आहे. याच पार्श्वभूमीवर आज पंतप्रधान नरेंद्र मोदींनी आढावा बैठक बोलवली आहे. या बैठकीमधील चर्चेनंतर राज्यामध्ये पुन्हा एकदा मास्क सक्तीचा निर्णय घेतला जाण्याची शक्यता व्यक्त केली जातेय. व्हिडीओ कॉन्फरन्सच्या माध्यमातून होणाऱ्या या बैठकीमध्ये सर्व राज्यांच्या मुख्यमंत्र्यांना सहभागी होण्यास सांगण्यात आलंय.

मास्क सक्ती

राज्यात पुन्हा चित्रपटगृहे, नाट्यगृहे, सभागृहे, मॉल्स अशा गर्दीच्या बंदिस्त ठिकाणी मुखपट्टी वापराची सक्ती लागू करण्याची सूचना डॉक्टरांच्या कृतीगटाने मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांना केली आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी करोना परिस्थितीबाबत आज सर्व राज्यांच्या मुख्यमंत्र्यांची बैठक बोलाविली आहे. त्यानंतर संबंधितांशी विचारविनिमय करून राज्य सरकार मास्क सक्तीबाबत निर्णय घेणार असल्याचं सांगितलं जात आहे.

आकडेवारीवर होणार चर्चा

समोर आलेल्या माहितीनुसार आरोग्य सचिव राजेश भुषण हे या बैठकीमध्ये सध्या देशातील कोरोना परिस्थितीसंदर्भात एक प्रेझेन्टेशन देणार आहेत. यामध्ये ते कोरोना लसीकरणासंदर्भात आणि विशेष करुन बुस्टर संदर्भात माहिती देणार आहेत. कोणत्या राज्यामध्ये सध्या काय परिस्थिती आहे याची सविस्तर आकडेवारी या बैठकीमध्ये सादर केली जाणार आहे.


LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here