सोलापूर,दि.22: Tobacco Cancer: सार्वजनिक ठिकाणी होणाऱ्या धूम्रपानामुळे प्रत्येकी पाचवा माणूस बळी पडत आहे. कुटुंब व्यवस्था उद्ध्वस्त होत असून याला आळा घालण्याकरता तंबाखू नियंत्रण कायद्याची (Tobacco Act) प्रभावी अंमलबजावणी करणे गरजेचे आहे, असे प्रतिपादन निवासी उपजिल्हाधिकारी शमा पवार (Resident Deputy Collector Shama Pawar) यांनी केले.
जिल्हा सामान्य रुग्णालयाचा तंबाखू नियंत्रण कक्ष व मराठवाडा ग्रामीण विकास संस्था औरंगाबाद यांच्यावतीने सोलापूर शहरात पुढील चार दिवस चित्ररथाद्वारे तंबाखूचे दुष्परिणाम (Side effects of tobacco) संदर्भात जनजागृती पर अभियान राबविण्यात येत आहे. या चित्ररथाच्या उद्घाटन प्रसंगी त्या बोलत होत्या.
निवासी उपजिल्हाधिकारी शमा पवार म्हणाल्या, तंबाखूजन्य पदार्थांच्या सेवनामुळे तरुण पिढी व्यसनाधीन होत असून मौखिक कर्करोगाचे (Oral cancer) प्रमाण वाढले आहे. युवकांचे कर्करोगामुळे मृत्यू होण्याचे प्रमाण दिवसेंदिवस वाढत असून त्यामुळे सामाजिक समतोल बिघडत आहे. त्यामुळे याबाबत जनजागृती करणेही गरजेचे आहे. त्यासाठी हा चित्ररथ मदतीचा ठरेल, असे त्या म्हणाल्या.
याप्रसंगी जिल्हा शल्य चिकित्सक डॉ. प्रदीप ढेले, निवासी वैद्यकीय अधिकारी डॉ. एस. एम. कुलकर्णी, तहसीलदार अंजली मरोड, विभागीय अधिकारी रंगनाथ जोशी, नशाबंदी मंडळाचे प्रमुख रुस्तुम कंप्पल्ली, जिल्हा तंबाखू नियंत्रण कक्षाच्या समुपदेशिका मंजुश्री मुळे, सामाजिक कार्यकर्ते अमित महाडिक, नामदेव भैरी तसेच पोलीस अधीक्षक कार्यालयातील अधिकारी, कर्मचारी उपस्थित होते.