कोलकाता,दि.29: पश्चिम बंगालमध्ये एका व्हिडिओवरून भाजपने (BJP) सत्ताधारी तृणमूल काँग्रेसवर (TMC) निशाणा साधला आहे. या व्हिडिओमध्ये आसनसोल लोकसभा जागेच्या पोटनिवडणुकीत मतदान करण्यासाठी भाजप समर्थकांना धमकावण्यास टीएमसी (TMC) आमदार पक्ष कार्यकर्त्यांना सांगत आहेत. निवडणुकीच्या तयारीच्या बैठकीत पांडबेश्वरमधील तृणमूल काँग्रेसचे आमदार नरेन चक्रवर्ती (Naren Chakraborty) पक्ष कार्यकर्त्यांना सांगत आहेत, ‘त्यांना सांगा, तुम्ही मतदान केले तर मतदान केल्यानंतर कुठे जाणार, ते तुमच्या जबाबदारीवर आहे’, असे व्हिडिओमध्ये म्हणताना दिसून आले आहे. हा व्हिडिओ भाजपच्या आयटी सेलचे प्रमुख अमित मालवीय, बंगाल विधानसभेतील विरोधी पक्षनेते सुवेंदू अधिकारी आणि इतर नेत्यांनी शेअर केला आहे.
पांडबेश्वर विधानसभा जागा आसनसोल लोकसभा जागेचा एक भाग आहे, जिथे पोटनिवडणुकीसाठी 12 एप्रिल रोजी मतदान होणार आहे. व्हिडिओमध्ये चक्रवर्ती यांना बंगालीमध्ये असे म्हणताना ऐकू येते की, “जे भाजपचे कट्टर समर्थक आहेत आणि ज्यांना प्रभावित करता येत नाही, त्यांना धमकावले जाऊ शकते.” त्यांना सांगा, ‘तुम्ही मतदान करायला गेलात, तर तुम्ही भाजपला मतदान कराल, असे आम्ही मानू. मतदान केल्यानंतर तुम्ही तुमच्या जबाबदारीवर आहात आणि तुम्ही मतदानाला गेला नाही तर तुम्ही आम्हाला पाठिंबा देत आहात असे आम्ही मानू. तुम्ही चांगले रहा, नोकरी व्यवसायासाठी जा, आम्ही तुमच्या सोबत आहोत. व्हिडिओ ट्विट करत मालवीय यांनी ट्विट केले की, ‘हे गुन्हेगार तुरुंगातील धडे गिरवायला हवेत पण बंगालमध्ये ममता बॅनर्जी त्यांना संरक्षण देतात. निवडणूक आयोगाने याकडे लक्ष द्यावे.
सुवेंदू अधिकारी यांनी आपल्या ट्विटमध्ये म्हटले आहे की, चक्रवर्ती हे यापूर्वी बर्दवान जिल्हा परिषदेचे सदस्य आणि तृणमूल काँग्रेसच्या पांडबेश्वर ब्लॉक युनिटचे अध्यक्ष होते. ते म्हणाले की, आमदार चक्रवर्ती यांना 2016 मध्ये कोलकाता विमानतळावर विनापरवाना बंदूक आणि काडतुसे घेऊन उड्डाण करण्याचा प्रयत्न करताना ताब्यात घेण्यात आले होते.
याप्रकरणी तृणमूल काँग्रेसकडून कोणतीही प्रतिक्रिया आलेली नाही. माजी केंद्रीय मंत्री आणि खासदार बाबुल सुप्रिया यांच्या राजीनाम्यामुळे आसनसोलची जागा रिक्त झाली होती. बाबुल यांनी भाजपचा राजीनामा देऊन टीएमसीमध्ये प्रवेश केला आहे. टीएमसीने बॉलिवूड अभिनेता आणि राजकारणी शत्रुघ्न सिन्हा यांना आसनसोल मतदारसंघातून उमेदवार म्हणून घोषित केले आहे. शत्रुघ्न सिन्हा भाजपमधून काँग्रेसमध्ये व नंतर टीएमसीमध्ये दाखल झाले आहेत. या जागेवरून भाजपने अग्निमित्र पॉल (Agnimitra Paul) यांना उमेदवारी दिली आहे.