दि.11: नितीशकुमार यांनी बिहारमध्ये सर्वात मोठा राजकीय खेळ खेळला आहे. पुन्हा एकदा महाआघाडीसोबत जात त्यांनी एनडीएला सत्तेतून बेदखल केले आहे. मात्र या राजकीय उलथापालथीचा सर्वाधिक फायदा कोणाला झाला, असा प्रश्न उपस्थित होतो. एनडीएपासून फारकत घेणे ही नितीशकुमार यांचे बरोबर आहे का?
बिहारमध्ये मुख्यमंत्रिपदाची पहिली पसंती कोणाला, हा सर्वांत मोठा प्रश्न होता. या प्रश्नाच्या उत्तरात 43 टक्के लोकांनी तेजस्वी यादव यांना उत्तम मुख्यमंत्री मानले. हा आकडा स्वतःमध्ये लक्षणीय आहे कारण या महाआघाडीच्या सरकारमध्ये नितीश यांना मुख्यमंत्रीपद देण्यात आले आहे आणि तेजस्वी उपमुख्यमंत्री झाल्याबद्दल समाधानी आहेत.
पण सी वोटरच्या आकडेवारीवरून तेजस्वीच्या लोकप्रियतेत मोठी वाढ झाल्याचे दिसून येते. आता तेजस्वी अधिक लोकप्रिय झाले तर नितीश कुमार तोट्यात असल्याचे दिसत आहे. सर्वेक्षणानुसार, सध्या केवळ 24 टक्के लोक नितीश यांना मुख्यमंत्रिपदाची पहिली पसंती मानतात. दुसरीकडे, भाजपचा कोणताही चेहरा मुख्यमंत्री झाला, तर 19 टक्के लोक त्यांची पसंदी असल्याचे सांगत आहेत.
बिहारमध्ये आज लोकसभेची निवडणूक झाल्यास भाजपाच्या नेतृत्वाखालील एनडीएची दाणादाण उडणार असून, महाआघाडी जोरदार मुसंडी मारणार आहे. या सर्व्हेमधून समोर आलेल्या आकडेवारीनुसार 2019 मध्ये एनडीएला प्रचंड मतदान झाले होते. भाजपा आणि एनडीएला तब्बल 54 टक्के मते मिळाली होती. मात्र 2022 च्या ऑगस्टमध्ये हा आकडा घटून 41 टक्क्यांवर आला आहे. म्हणजेच तीन वर्षांत एनडीएचं 13 टक्के मतांचं नुकसान झालं आहे. तर एनडीएला झालेल्या नुकसानाचा थेट फायदा महाआघाडीला होताना दिसत आहे. महाआघाडीला 2019 च्या लोकसभा निवडणुकीत 31 टक्के मतं मिळाली होती.
मात्र आता बदललेल्या समीकरणांचा थेट फायदा महाआघाडीला होताना दिसत आहे. महाआघाडीला 46 टक्के मते मिळतील. म्हणजेच सुमारे 15-16 टक्के अधिकची मतं महाआघाडीला मिळतील. त्यामुळे गेल्या लोकसभा निवडणुकीत 39 जागा जिंकणाऱ्या एनडीएला आता लोकसभा निवडणूक झाल्यास केवळ 14 जागांवर समाधान मानावे लागण्याची शक्यता आहे. तर महाआघाडीला तब्बल 26 जागा मिळू शकतात.