नवी दिल्ली,दि.28: दक्षिण आफ्रिकेत (South Africa) कोरोनाचा नवीन व्हेरिएंट (omicron) आढळल्याने अनेक देशात खळबळ माजली आहे. दक्षिण आफ्रिकेत आढळलेला नवीन व्हेरिएंट ओमीक्रॉनची व्याप्ती आता 11 हून अधिक देशांत वाढली आहे. केंद्र सरकारने ओमीक्रॉन बद्दल वाढत्या चिंतेच्या पार्श्वभूमीवर सर्व राज्य सरकारांना चाचण्या वाढविण्याचे आणि हॉटस्पॉट भागात कडक नजर ठेवण्याचे निर्देश दिले आहेत.
दक्षिण आफ्रिकेत सापडलेल्या कोरोनाच्या या नव्या प्रकाराचा धोका वाढत आहे. हे लक्षात राज्यांनी स्थितीवर कडक नियंत्रण ठेवायला हवे, असे केंद्राने म्हटले आहे. ज्या देशांमध्ये कोरोनाचा नवीन प्रकार आढळून आहे, त्यांना भारताने ‘जोखीम’ असलेल्या देशांच्या श्रेणीत टाकले आहे. आता विदेशातून भारतात येणाऱ्या प्रवाशांना अतिरिक्त उपायांचा अवलंब करण्यास सांगण्यात आले आहे.
रविवारी (दि.28) केंद्रीय आरोग्य मंत्रालयाने एक निवेदन जारी केले आहे. ‘संसर्ग प्रभावीपणे नियंत्रित करण्यासाठी सखोल नियंत्रण, सक्रिय पाळत ठेवणे, लसीकरणाला गती देणे आणि कोविड प्रोटोकॉलची अंमलबजावणी करणे आवश्यक आहे’, असे केंद्र सरकारने म्हटले आहे.
‘विदेशातून येणारे सर्व प्रवासी आणि ‘जोखीम’ श्रेणीतील इतर देशांतून येणाऱ्या प्रवाशांची योग्य प्रकारे चाचणी करण्यात यावी. पॉझिटिव्ह आढळल्यास, नमुना INSACOG प्रयोगशाळेत पाठवा. ज्या राज्यांमध्ये चाचणी कमी केली जात आहे, तिथे चाचण्यांची संख्या वाढवी, असे केंद्र सरकारने सर्व राज्यांना आणि केंद्रशासित प्रदेशांना लिहिलेल्या पत्रात असे म्हटले आहे. कोरोना व्हायरसच्या नवीन प्रकाराबाबत केंद्रीय आरोग्य मंत्रालयाने राज्यांना दुसऱ्यांदा हा इशारा दिला आहे.