पुणे,दि.21: Corona: कोरोनाची आणखी एक लाट येऊ शकते, असा इशारा WHO शास्त्रज्ञ डॉ. सौम्या स्वामीनाथन यांनी दिला आहे. जगभरात कोरोनाने थैमान घातले होते. भारतासह अनेक देशात कोरोनामुळे अनेकांना जीव गमवावा लागला. गेली दोन वर्ष जगभरात धुमाकूळ घातलेला कोरोना आता काही प्रमाणात कमी झाल्याचं पाहायला मिळत आहे. भारतातही कोरोना रुग्णसंख्येत घट झाली असल्याने नागरिकांनी सुटकेचा निश्वास सोडला आहे. मात्र, अशातच आता एक चिंता वाढवणारी बातमी समोर आली आहे. जागतिक आरोग्य संघटनेचे (WHO) मुख्य शास्त्रज्ञ डॉ. सौम्या स्वामीनाथन यांनी गुरुवारी सांगितलं की, SARS-CoV-2 विषाणूच्या Omicron प्रकाराच्या XBB उप-प्रकारामुळे काही देशांमध्ये कोरोना संसर्गाची आणखी एक लाट येऊ शकते.
पुण्यात विकसनशील देश लस उत्पादक नेटवर्क (DCVMN) च्या वार्षिक सर्वसाधारण सभेत त्यांनी माध्यमांशी बोलताना ही माहिती दिली. त्यांनी स्पष्ट केलं की आतापर्यंत कोणत्याही देशाकडून असा कोणताही डेटा प्राप्त झालेला नाही, ज्यावरून असं दिसून येतं की संसर्गाचा हा नवीन प्रकार अधिक गंभीर आहे.
डॉ. स्वामीनाथन यांनी सांगितलं की, “Omicron चे 300 हून अधिक उप-प्रकार आहेत. मला वाटतं सध्या चिंतेची बाब म्हणजे XBB, जो एक रीकॉम्बिनंट व्हायरस आहे. आम्ही याआधी काही रीकॉम्बिनंट व्हायरस पाहिले आहेत. ज्याच्या पुढे रोगप्रतिकारक शक्तीही कमी पडते, याचा अर्थ अँटीबॉडीज देखील त्यावर परिणाम करत नाहीत. त्यामुळे XBB मुळे काही देशांमध्ये संक्रमणाची नवीन लाट आपल्याला हळूहळू दिसू शकते.”
म्युटेशनमुळे हा विषाणू अधिक संसर्गजन्य होत असल्याचं त्यांनी सांगितलं. याला सामोरे जाण्यासाठी डॉ.स्वामिनाथन यांनी यावर विशेष लक्ष ठेवण्याचा आणि देखरेखीचा सल्ला दिला. संसर्गापासून बचाव करण्यासाठी मास्क वापरणं सुरू ठेवण्याचा सल्लाही त्यांनी दिला.