सोलापूर,दि.11: माजी गृहमंत्री सुशीलकुमार शिंदे (Sushilkumar Shinde) यांचा मोबाईल चोरताना तरुणाला रंगेहाथ पकडण्यात आले आहे. काँग्रेसचे नेते सुशिलकुमार शिंदे यांचा मोबाईलची चोरी करणे चोराला महागात पडले आहे. रेल्वे प्रवासाच्या दरम्यान सुशील कुमार शिंदे यांचा मोबाईल चोरीचा प्रयत्न झाला. पण, सुशीलकुमार शिंदे सुद्धा कमी नाही, त्यांनी या चोराला फोन चोरताना रंगेहाथ पकडले आणि रेल्वे पोलिसांच्या ताब्यात दिले.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, काँग्रेसचे नेते सुशीलकुमार शिंदे हे सोलापूरहुन मुंबईकडे सिद्धेश्वर रेल्वेनं प्रवास करत होते. त्याच दरम्यान ही घटना घडली. सुशीलकुमार शिंदे हे मुंबईला कामाच्या निमित्ताने रेल्वेनं येत होते. त्यावेळी प्रवासात एका तरुणाने सुशीलकुमार शिंदे यांचा मोबाईल चोरण्याचा प्रयत्न केला.
गाडी मुंबईजवळ पोहोचली असता सुशीलकुमार शिंदे हे टॉयलेटमध्ये गेले होते, त्याच वेळी संधी साधून या चोरट्याने शिंदेंचा मोबाईल चोरण्याचा प्रयत्न केला.
पण, शिंदे यांच्या नजरेतून या तरुणाची मोबाईल चोरी चुकली नाही. शिंदे यांनी आपल्या डोळ्यांनी आपलाच मोबाईल चोरी होताना पाहिला. त्यांनी लगेच आपल्यासोबत असलेल्या पोलीस कॉन्स्टेबलला सांगून तरुणाला पकडले.
त्यानंतर तातडीने याची माहिती पोलिसांनी दिली. दादर रेल्वे स्थानकावर रेल्वे पोलिसांनी तरुणाला ताब्यात घेतलं. मंदार प्रमोद गुरव असं या आरोपीचं नाव आहे. आरोपी हा छेत्र इथं राहणार आहे. तो सुशीलकुमार शिंदे ज्या डब्यातून प्रवास करत होते, त्याच डब्यातून तो प्रवास करत होता. पोलिसांनी या तरुणाला अटक केली असून त्याच्यावर गुन्हा दाखल करण्यात आला आहे.