औरंगजेबचा फोटो स्टेटसवर ठेवणार्‍या तरुणाला पोलीस कोठडी

कायदा, सुव्यवस्था पाळण्याचे पोलिसांचे आवाहन

0

सोलापूर,दि.9: धार्मिक भावना दुखावण्याच्या हेतूने मोबाईल स्टेटसवर औरंजेबाचा फोटो ठेऊन आक्षेपार्ह मजकूर लिहिल्याचा प्रकार गोदुताई परुळेकर विडी घरकूल, कुंभारी येथे गुरुवारी दुपारी तीनच्या सुमारास उघडकीस आला. याची माहिती मिळताच वळसंग पोलिस ठाण्याच्या पथकाने त्या युवकाला तत्काळ ताब्यात घेऊन न्यायालयात हजर केले असता त्याला सोमवारपर्यंत पोलिस कोठडी मिळाली आहे.

औरंगजेबचा फोटो स्टेटसवर

गुरुवारी दुपारी तीनच्या सुमारास संशयित आरोपी शोहेब मंगळूरकर (रा. 598/4, अ विभाग, नवीन विडी घरकुल, कुंभारी, ता. दक्षिण सोलापूर) याच्या मोबाईल स्टेटस्वर औरंजेबाचा फोटो ठेऊन धार्मिक भावना दुखावण्याबरोबरच दोन समाजामध्ये तेढ निर्माण होईल असे लेखन केल्याचे आढळून आले. हा प्रकार लक्षात येताच अनिरुद्ध जगदीश फलमारी यांनी वळसंग पोलिस ठाण्याचे प्रभारी अधिकारी सपोनि अनिल सनगल्ले यांच्याशी संपर्क साधून माहिती दिली. सनगल्ले यांनी तत्काळ पोलिस पथकासह तपासाची चक्रे फिरवून संशयित आरोपी शोहेब मंगळूरकर याला ताब्यात घेतले.

याबाबत अनिरुद्ध फलमारी यांनी दिलेल्या फिर्यादीत म्हटले आहे की, धर्माबद्धल द्वेष भावना निर्माण करण्याबरोबरच औरंगजेबाचे उद्धातीकरण आरोपीने केले आहे. यामुळे जनमानसात शत्रुत्व, द्वेशाची भावना वाढली आहे. सर्वात कहर म्हणजे हिंदू-मुस्लीम समाजामध्ये तेढ वाढवून एकोपा टिकविण्यास बाधक असे कृत्य केले आहे. यामुळे भविष्यात मोठा दखलपात्र अपराध घडण्याची शक्यता नाकारता येत नाही, असे म्हटले आहे. त्याच्यावर भादविसं कलम 153 अ, 153 (ब), 295 अ, 505 (2) प्रमाणे गुन्हा दाखल झाला असून, घटनास्थळी उपविभागीय पोलिस अधिकारी अमोल भारती, सपोनि अनिल सनगल्ले यांनी भेट देऊन नागरिकांना शांततेचे आवाहन केले आहे. दिवसभर विडी घरकूल, कुंभारीसह वळसंग पोलिस ठाण्याच्या हद्दीमध्ये पोलिस गस्त घालत शांततेचे आवाहन करण्याबरोबरच परिस्थितीवर नियंत्रण मिळवत असल्याचे सपोनि सनगल्ले यांनी सांगितले.

दोन समाजामध्ये तेढ निर्माण होईल असे कृत्य करू नये

दोन समाजामध्ये तेढ निर्माण होईल, धार्मिक भावना दुखावेल, असे कृत्य करुन कायदा सुव्यवस्था बिघडू नये. असे आढळून आल्यास संबंधितांवर कडक कारवाई करण्यात येईल. अशा घटना घडल्यास नागरिकांनी संपर्क साधावा. कोणीही घाबरु नये. पोलिस आपल्या पाठीशी आहेत.
-सपोनि अनिल सनगल्ले, प्रभारी अधिकारी, पोलिस ठाणे, वळसंग


LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here