प्रांताधिकारी हेमंत निकम यांच्या कामाची कार्यालयातच होणार तपासणी

प्रांताधिकारी हेमंत निकम यांनी भ्रष्टाचार केल्याची तक्रार करण्यात आली होती

0

सोलापूर,दि.१३: प्रांताधिकारी हेमंत निकम यांच्या भ्रष्ट कामाची चौकशी करण्याबाबत तपासणी पथक नियुक्त करण्यात आले आहे. १४ ते १६ डिसेंबर दरम्यान सलग तीन दिवस कार्यालयात तपासणी होणार आहे, अशा आशयाचे पत्र पुरवठा विभागाचे उपायुक्त डॉ. त्रिगुण कुलकर्णी यांनी दिले आहे. माजी मंत्री दिलीप सोपल (Dilip Sopal), सामाजिक कार्यकर्ते जयराज नागणसुरे (Jayraj Nagansure) व संदीप शितोळे या तिघांनी दिलेल्या तक्रारीवरून ही तपासणी केली जाणार आहे.

प्रांताधिकारी हेमंत निकम यांच्यावर भ्रष्टाचाराचा आरोप

माजी मंत्री दिलीप सोपल यांनी बार्शी येथील गौण खनिज खाणीबाबत केलेल्या कामाची तक्रार केली होती. संदीप शितोळे यांनी उत्तर सोलापूर तालुक्यातील बसवेश्वर नगर येथील राष्ट्रीय महामार्गाच्या भूसंपादन कामात जास्त पैसे दिल्याची तक्रार केली होती. भूसंपादनाच्या कामात ३ कोटी ४६ लाख ९ हजार २३३ रुपये मूल्यांकन होते; मात्र संबंधित जमीनमालकाला ५ कोटी ७८ लाख ७४ हजार ६३९ रुपये देण्यात आले आहेत, असे तक्रारीत नमूद केले होते. याबाबत सखोल चौकशी झाली आहे, भूमी अभिलेखच्या उपजिल्हाधिकारी अरुणा गायकवाड यांनी अहवाल तयार केला होता.

काय आहे प्रकरण?

जयराज नागणसुरे यांनी सोलापूर जिल्हाधिकारी मिलिंद शंभरकर यांच्याकडे तक्रार केली होती. मात्र याची दखल न घेतल्याने नागणसुरे यांनी विभागीय आयुक्त सौरव राव यांच्याकडे तक्रार केली. याचीही दखल न घेतली गेल्याने त्यांनी राज्याचे तत्कालीन महसूल मंत्री व मुख्यमंत्री यांच्याकडे तक्रार केली. जयराज नागणसुरे यांनी सतत पाठपुरावा करत याची तक्रार लोकायुक्त विद्यासागर कानडे यांच्याकडे केली.

जयराज नागणसुरे यांनी ति-हे व सांगोला रोडवरील ठिकठिकाणी झालेल्या भूसंपादनातील भ्रष्टाचाराबाबत तक्रार केली होती. जिथे एक एकर जागा संपादित झाली, तेथे सव्वा ते दीड एकर दाखवण्यात आले आहे. कॉलेजची जागा गेली नसताना, ती गेल्याचे दाखवण्यात आले आहे. वन विभागाची जागा खासगी मालकाची दाखवून नुकसानभरपाई देण्यात आल्याची तक्रार त्यांनी दिली होती. सर्व तक्रारीची दखल घेऊन विभागीय आयुक्तांनी चौकशी समिती नेमली आहे.

पथकामध्ये यांचा समावेश

भ्रष्ट कामाच्या तपासणी पथकामध्ये उपायुक्त डॉ. त्रिगुण कुलकर्णी, सातारा येथील भूसंपादन क्र.२ च्या उपजिल्हाधिकारी संगीता राजापूरकर-चौगुले, सहायक जिल्हा पुरवठा अधिकारी विवेक साळुंखे यांची नियुक्ती करण्यात आली आहे. सलग तीन दिवस सकाळी ९ पासून ही तपासणी होणार आहे. दरम्यान, प्रांताधिकारी हेमंत निकम यांनाही तपासणी करणेकामी उपस्थित राहण्यास सांगण्यात आले आहे.

हेमंत निकम यांना त्यांच्या कार्यकाळातील सर्व महसुली कामकाजाबाबतच्या संचिका तपासणी कामी उपलब्ध करून देण्यात यावेत अशा सूचनाही दिल्या आहेत.


LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here