नवी दिल्ली,दि.14: सुप्रीम कोर्टाने अजित पवार गटाला महत्वाचा आदेश दिला आहे. अजित पवार यांनी बंड करत राष्ट्रवादी पक्ष व चिन्ह मिळवले. सुप्रीम कोर्टाने अजित पवार गटाला फटकारलं आहे. सुप्रीम कोर्टाने अजित पवार गटाला शरद पवारांचं नाव आणि फोटो न वापरण्याचा आदेश दिला आहे. निवडणूक प्रचारात शरद पवारांच्या नावाचा आणि फोटोचा वापर करु नका अशा शब्दांत सुप्रीम कोर्टाने अजित पवार गटाला सुनावलं आहे. तसंच यासंबंधी लेखी हमी देण्यास सांगण्यात आलं आहे. शरद पवार गटाकडूनच यासंबंधी तक्रार करण्यात आली होती.
शरद पवार गटाने अजित पवार गटाविरोधात तक्रार केली होती. निवडणुकीच्या प्रचारात मतदारांना आवाहन करताना अजित पवार गटाकडून शरद पवारांच्या नावाचा आणि फोटोचा वापर केला जात असल्याचं तक्रारीत सांगण्यात आलं होतं. यावर सुप्रीम कोर्टाने आश्चर्य व्यक्त केलं.
अजित पवार यांच्या नेतृत्वातील राष्ट्रवादी कॉग्रेस पक्षाकडून शरद पवार यांचे नाव आणि त्यांचा फोटो वापरला जात आहे. शरद पवार यांच्या लोकप्रियतेचा फायदा घेण्यासाठी असे केले जात असल्याचे सिंघवी यांनी कोर्टात सांगितले. यावेळी त्यांनी शरद पवारांचा फोटो असलेली अजित पवार गटाची पोस्टरही दाखवलेत. अजित पवार यांच्यात हिंमत असेल तर त्यांनी स्वत:च्या नावाने मते मागावी. शरद पवारांचे नाव कशाला वापरता? असा सवाल सिंघवी यांनी उपस्थित केला.
सुप्रीम कोर्टाने सुनावणीदरम्यान अजित पवार गटाला फटकारलं. जेव्हा निवडणूक जवळ येतात तेव्हा तुम्हाला शरद पवारांची गरज वाटते. जेव्हा निवडणुका नसतात तेव्हा मात्र तुम्हाला गरज वाटत नाही. आता तुमची एक वेगळी ओळख आहे. तुम्ही मतदारांमध्ये जाताना याच नव्या ओळखीने गेलं पाहिजे अशा शब्दांत सुप्रीम कोर्टाने सुनावलं आहे. तसंच कोर्टाने अजित पवार गटाला 2 दिवसांत लेखी हमी देण्याचा आदेश दिला आहे. 19 मार्चला याप्रकरणी पुढील सुनावणी होणार आहे.