सोलापूर,दि.३०: मराठा समाजाने आरक्षण मिळावे या मागणीसाठी आंदोलन सुरू केले आहे. या आंदोलनाने आता उग्र रूप धारण केले असून सोमवारी सायंकाळी साडेसात वाजण्याच्या सुमारास सोलापूर-अक्कलकोट रोडवरील मल्लिकार्जुन नगर परिसरात राष्ट्रीय छावा संघटनेने रस्त्यावर टायर पेटवून शासनाचे लक्ष वेधले.
दरम्यान, एक मराठा…लाख मराठा…आरक्षण आमच्या हक्काचं..नाही कोणाच्या बापाचं..अशा एकापेक्षा घोषणांनी अक्कलकोट रोड दणाणून गेला होता. अचानक झालेल्या आंदोलनामुळे पोलिसांची चांगलीच तारांबळ उडाली. पोलिस घटनास्थळी दाखल झाल्यानंतर आंदोलकांना ताब्यात घेत रस्त्यावरील जळते टायर बाजूला करून वाहतूक सुरळीत करण्याचा प्रयत्न केला. अर्धा तासभर वाहतूक खोळंबली होती, वाहनांच्या अर्धा ते एक किलोमीटरपर्यंत रांगा लागल्या होत्या.
दरम्यान, सोमवारी सकाळपासून आरक्षणाच्या मागणीसाठी विविध ठिकाणी आमरण उपोषण, सामूहिक मुंडण, तिरडी मोर्चा, उपोषण व गावबंदीचा ज्वर गावोगावी पसरला आहे. गावागावांत रात्रंदिवस मराठा आरक्षणाला पाठिंबा देण्यासाठी वेगवेगळी आंदोलने सुरू झाली आहेत.