दि.१६: दोन दिवसांपूर्वी शिवसंग्राम संघटनेचे प्रमुख विनायक मेटे यांचं अपघाती निधन झालं. त्यांच्या निधनानंतर एकीकडे राजकीय वर्तुळातून शोक व्यक्त होत असताना दुसरीकडे घातपाताचा संशय देखील व्यक्त केला जात होता. विशेषत: विनायक मेटेंचा अपघात झाल्यानंतर जवळपास तासभर तिथे मदत पोहोचली नाही, असा देखील दावा केला जात असून त्यासंदर्भात आता मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंनी चौकशीचे आदेश दिले आहेत. या प्रकरणी पोलिसांची वेगवेगळी पथके तपास करत असताना आता अजून एक धक्कादायक दावा करण्यात आला आहे. हा दावा विनायक मेटेंसोबत काही दिवसांपूर्वी बीड ते पुणे प्रवास केलेल्या एका कार्यकर्त्याने केला असून त्यावरून मेटेंच्या अपघातामागचं गूढ अधिकच वाढलं आहे.
नेमकं झालं काय?
मराठा आरक्षणासाठी १४ ऑगस्ट रोजी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी बोलावलेल्या बैठकीसाठी विनायक मेटे बीडहून मुंबईच्या दिशेने येत होते. रविवारी पहाटे ५ च्या सुमारास महामार्गावरील माडप बोगद्याजवळ त्यांच्या कारला भीषण अपघात झाला. विनायक मेटे यांना रुग्णालयात दाखल केल्यानंतर मृत घोषित करण्यात आलं. मात्र, यावरून आता संशय व्यक्त केला जाऊ लागला आहे. मराठा क्रांती ठोक मोर्चाचे समन्वयक बाळासाहेब खैरे पाटील यांनी प्रसारमाध्यमांशी बोलताना या घडामोडींवर प्रश्नचिन्ह उपस्थित केलं आहे. “आम्ही माहिती घेतली त्यानुसार अपघात झाला तेव्हा २ तास तिथे रुग्णवाहिका आली नाही. कोणतीही सुविधा मिळाली नाही. आजूबाजूला मदतीसाठी कुणी थांबलं नाही. येण्या-जाण्यातही बराच वेळ गेला. या संपूर्ण प्रकरणाची सखोल चौकशी व्हायला हवी”, अशी मागणी त्यांनी केली आहे.
दरम्यान, यासंदर्भात वृत्तवाहिनीशी बोलताना विनायक मेटे यांच्या एका कार्यकर्त्याने ३ ऑगस्ट रोजी देखील त्यांच्या कारचा दोन गाड्यांनी पाठलाग केला होता, असा खळबळजनक दावा केला आहे.
२ किलोमीटरपर्यंत झाला पाठलाग!
शिवसंग्रामचे कार्यकर्ते अण्णासाहेब वायकर यांनी विनायक मेटेंच्या गाडीचा जवळपास २ किलोमीटरपर्यंत पाठलाग झाल्याचा दावा केला आहे. ३ ऑगस्ट रोजी विनायक मेटे त्यांच्या एका कार्यकर्त्यासमवेत पुण्याच्या दिशेने येत असताना हा प्रकार घडल्याचं त्यांनी मेटेंसोबतच्या त्या कार्यकर्त्याच्या हवाल्याने वाहिनीला दिलेल्या प्रतिक्रियेमध्ये सांगितलं आहे.
“३ ऑगस्ट रोजी पुण्याजवळ दोन गाड्यांनी मेटेंच्या गाडीचा २ किलोमीटरपर्यंत पाठलाग केला होता. त्यात एक अर्टिगा कार होती आणि दुसरी आयशर होती. मी विनायक मेटेंना म्हणालो की थांबून बघू. पण ते म्हणाले जाऊ दे, प्यायलेले आहेत. आम्ही बैठकीसाठी बीडहून येत होतो. आमच्या गाडीच्या पुढे आयशर होती. मागून एक अर्टिगा कार कट मारत होती. त्यात तीन-चार लोक बसले होते. विनायक मेटेंची गाडी समाधान वाघमोडे चालवत होता. तीन ऑगस्टला पुण्याच्या अलिकडे शिक्रापूरजवळ हा प्रकार घडला”, अशी माहिती अण्णासाहेब वायकर यांनी दिली.
अपघाताच्या दिवशी नेहमीचा चालक सुट्टीवर?
दरम्यान, विनायक मेटे यांचा अपघात झाला त्या दिवशी अर्थात १४ ऑगस्ट रोजी त्यांचा नेहमीचा चालक समाधान वाघमोडे हा सुट्टीवर असल्याची माहिती देखील या कार्यकर्त्यांकडून देण्यात आली आहे. समाधान वाघमोडेच्या वडिलांचं निधन झाल्यामुळे तो गावी गेला होता. त्याच्या जागी एकनाथ कदम याला त्या दिवशी बोलावण्यात आलं होतं.