बांगलादेशमधील माध्यमांनी हिंदूंविरोधात हिंसाचाराचा केला निषेध

0

दि.१९: बांगलादेशात नवरात्रौत्सवाच्या काळात हिंदू मंदिरे, दुर्गा पूजा मंडप यांच्यावर हल्ले करण्यात आले. बांगलादेशमधील माध्यमांनी या हिंसाचाराचा निषेध केला असून बहुसंख्य समाजाने धार्मिक सलोखा, एकोपा वाढवण्यासाठी प्रयत्न करण्याची आवश्यकता असल्याचे म्हटले. मागील काही दिवसांपासून बांगलादेशमध्ये अल्पसंख्याक विशेषत: हिंदू समुदायाविरोधात हिंसाचार उफाळून आला आहे. या हल्ल्यानंतर पंतप्रधान शेख हसीना सरकारवर टीका सुरू झाली आहे. तर, बांगलादेशमधील माध्यमांनीदेखील या हिंसाचारावर संताप व्यक्त करताना अल्पसंख्याक समुदायासाठी बहुसंख्य समुदायाची जबाबदारी आहे की नाही, असा थेट प्रश्न विचारला आहे.

बांगलादेशच्या स्वातंत्र्याला ५० वर्षे पूर्ण झाली. वर्ष १९७१ मध्ये बांगलादेशला पाकिस्तानपासून स्वातंत्र्य मिळाले. नैसर्गिक संकट, बिकट अर्थव्यवस्था, गरिबी यावर मात करत बांगलादेशने विकास सुरू ठेवला आहे. शेजारच्या देशांपेक्षाही बांगलादेशची अर्थव्यवस्था चांगली आहे. मात्र, अल्पसंख्याक समुदायांवर होणारे हल्ले, धर्मांधता यामुळे बांगलादेश सरकारच्या चिंतेत वाढ झाली आहे. धर्मांधतेमुळे विकासाला मोठा अडथळा निर्माण होण्याची शक्यता आहे. बांगलादेशमधील माध्यमांनी या हिंसाचाराचा निषेध केला असून बहुसंख्य समाजाने धार्मिक सलोखा, एकोपा वाढवण्यासाठी प्रयत्न करण्याची आवश्यकता असल्याचे म्हटले.

‘प्रथमालो’ या वृत्तसंकेतस्थळावरील लेखात सोहराब हसन यांनी आपल्या लेखात अल्पसंख्याक समुदायाविरोधातील हिंसाचारावर चिंता व्यक्त केली आहे. बांगलादेशला सद्भावनेचा देश असल्याचे म्हटले जाते. मात्र, सद्भावना कायम ठेवण्याची ही जबाबदारी बहुसंख्यक समाज विसरत असल्याचे त्यांनी म्हटले. बांगलादेशमधील बहुसंख्याक समुदायाला हिंदू समुदायावर होणाऱ्या हल्ल्यांविरोधात आंदोलन करावे लागणार असून त्याविरोधात आवाज उठवावा लागणार असल्याचेही त्यांनी म्हटले.

‘डेली स्टार’ या वृत्तसंकेतस्थळाने आपल्या संपादकियामध्ये पोलीस आणि प्रशासन हिंसाचारातील दोषींवर कारवाई करेल अशी अपेक्षा व्यक्त केली आहे. देशामध्ये सातत्याने अशा प्रकारच्या घटना का घडत आहेत, याचा विचार एक समाज म्हणून करण्याची गरज असल्याचे म्हटले आहे. धर्मांध, कट्टरतावादी संघटनांना जबाबदार धरून आपली जबाबदारी टाळता येणार नसल्याचेही ‘डेली स्टार’ने म्हटले. लोकांपर्यंत पोहचून धार्मिक सद्भावना वाढीस लावण्याची आवश्यकता आहे. त्यासाठी वेगवेगळ्या धार्मिक गटांमध्ये, संप्रदायांमध्ये एकोपा निर्माण होण्यासाठी प्रयत्न करण्याची आवश्यकता आहे. अशा प्रकरणांमध्ये समाजाची मोठी भूमिका असल्याचे संपादकियामध्ये म्हटले आहे.

‘ढाका ट्रिब्युन’ने ‘अल्पसंख्यकांसाठी कोणताही देश नाही’ या मथळ्याखाली एक लेख प्रकाशित केला आहे. अशा प्रकारच्या घटना या देशाला अस्थिर करण्याचा प्रयत्न असल्याचे म्हटले गेले आहे. कोणतेही मुद्दे असोत, मात्र, अल्पसंख्याकांना याचे परिणाम भोगावे लागत असल्याचे या लेखात म्हटले आहे. बांगलादेश विकास करत आहे. आपण विकासनशील देशांसाठी एक डेव्हलपिंग मॉडेल सादर करत आहोत. मात्र, जोपर्यंत आपण आपल्या देशातील प्रत्येक समुदाय आणि व्यक्तीसाठी सुरक्षित वातावरण निर्माण करण्यासाठी गंभीरपणे प्रयत्न करणार नाही. तोपर्यंत आपण प्रगती करू शकणार नसल्याचे ‘ढाका ट्रिब्युन’ने म्हटले.


LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here