आमदार सचिन कल्याणशेट्टी यांच्या प्रसंगावधानामुळे सर्पदंश झालेल्या व्यक्तीचे वाचले प्राण

0

सोलापूर,दि.5: अक्कलकोटचे भारतीय जनता पार्टीचे आमदार सचिन कल्याणशेट्टी (MLA Sachin Kalyanshetti) हे करजगी तालुका अक्कलकोट येथे नियोजित कार्यक्रमासाठी जात होते. वाटेत एका व्यक्तीस सर्पदंश झाल्याचे दिसून आले. त्याला तात्काळ उपचाराची गरज भासल्याने आमदार कल्याणशेट्टी यांनी आपली स्वतःची चार चाकी गाडी देऊन पुढील उपचारासाठी त्याला पाठवून दिले. पुढील नियोजित कार्यक्रमास उशीर होऊ नये यासाठी त्याच वेळी तिथे आलेल्या टमटमचा आधार घेऊन ते गेले.

अक्कलकोट तालुक्यातील करजगी व तडवळ या भागातील नियोजित कार्यक्रमाला आमदार सचिन कल्याणशेट्टी जात असताना कल्याणनगर ते करजगी दरम्यान रस्त्यावर काही लोक थांबल्याचे आढळून आले. त्यांना का थांबला याबाबत चौकशी केली असता. पान मंगरूळ येथील अमीन अहमदहनीफ मंद्रूप यास सर्प दंश झाल्याने त्याला मोटरसायकलवरून दवाखान्यात नेले जात असताना पेट्रोल संपल्याने, दुसऱ्या वाहनाची वाट पाहत हे लोक थांबल्याचे आमदार कल्याणशेट्टी यांना माहिती मिळाली.

तात्काळ आमदार कल्याणशेट्टी यांनी आपली चार चाकी गाडी सर्पदंश झालेल्या व्यक्तीस दवाखान्यात नेण्यासाठी दिली व स्वतः दुसऱ्या वाहनाची वाट पाहत थांबले. त्यावेळी तेथून जाणाऱ्या टमटम ला थांबवून ते पुढील नियोजित कार्यक्रमासाठी टमटमने मार्गस्थ झाले.

आमदार कल्याणशेट्टी यांच्या चार चाकी मधून सर्पदंश झालेले अमीन अहमदहनीफ मंद्रूप याला प्रथम अक्कलकोट येथील दवाखान्यात दाखल करण्यात आले. मात्र त्याची प्रकृती खालावत चालल्याने त्याला सोलापूर सिव्हिल रुग्णालयात दाखल करण्यात आले. आमदार कल्याण शेट्टी यांचे वाहन चालक असिफ बेग आणि सुरक्षा रक्षक यांनी सर्पदंश झालेल्या व्यक्तीची प्रकृती स्थिरावत नाही तो पर्यंत ते तेथेच हॉस्पिटलमध्ये थांबले. आमदार सचिन कल्याणशेट्टी यांनी वेळीच प्रसंगावधान दाखवल्याने एका तरुणाचे प्राण वाचले याची चर्चा सध्या सोशल मीडियावर सुरु आहे.


LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here