दि.21: भारत चीन तणावाच्या पार्श्वभूमीवर यापूर्वीच भारत सरकारने चिनी ॲप्सवर बंदी घातली होती. सुरक्षतेच्या कारणास्तव सरकारने हा निर्णय घेतला होता. चिनी Apps नंतर आता भारत सरकारची नजर चीनने बनवलेल्या फोन्सवर आहे. यासाठी भारत सरकार एक नवा नियम लागू करू शकते. हा नियम स्मार्टफोनच्या टेस्टिंगसाठी असेल, जेणेकरुन चिनी कंपन्यांनी बनवलेले फोन आणि त्यात दिलेले Apps देशातील नागरिकांची हेरगिरी तर करत नाहीत ना, हे यामुळे समजू शकेल.
अशाप्रकारचं पाऊल उचलण्याचा सरकारचा हा पहिलाच विचार नाही. याआधीही भारत सरकारने देशात 200 हून अधिक चिनी Apps बॅन केले होते. चीन आणि भारतदरम्यान सीमेवर सुरू असलेला वाद हे या बॅन मागचं कारण होतं.
आता सरकार सायबर स्नूपिंगसाठी विश्वासार्ह टेलिकॉम इक्विपमेंट आणि नेटवर्किंग प्रोडक्ट्सची एक यादी तयार करत आहे. सरकारच्या नियमांनुसार, फोनचे सर्व पार्ट्स आणि त्याचं इन-डेप्थ टेस्टिंग अनिवार्य केलं जाऊ शकतं.
एका रिपोर्टनुसार, जर हा नियम लागू झाला, तर चिनी मोबाइल कंपन्यांवर अधिक लक्ष द्यावं लागेल. हे नियमन Huawei आणि ZTE सारख्या अनेक मोठ्या कंपन्यांना टेलिकॉम नेटवर्किंगच्या संवेदनशील क्षेत्रांपासून दूर करण्यासाठी केलं जाऊ शकतं. त्याशिवाय डेटादेखील सुरक्षित ठेवला जाईल. यासह सरकार अशा देशांसाठीही विशेष नियम आणू शकते, ज्या देशांच्या सीमा भारताला मिळतात.