प्रसिद्ध न्यायाधीशावर दोन पोलीसांनी पिस्तुल रोखत केला हल्ला

0

पटना,दि.20: बिहारच्या कोर्टात पोलिस कर्मचाऱ्यांनी एडीजेवर (Additional District Judge) हल्ला केला. ज्यामध्ये त्यांना किरकोळ दुखापत झाली आहे. वास्तविक, प्रकरण मधुबनी जिल्ह्यातील झांझारपूर न्यायालयाचे आहे. मधुबनी जिल्ह्यातील झंझारपूर न्यायालयाच्या विधिक सेवा समितीचे अध्यक्ष ADJ अविनाश कुमार यांच्या चेंबरमध्ये घुसून पोलीस अधिकारी गोपाल कृष्ण आणि SI अभिमन्यु शर्मा यांनी बंदूक रोखत हल्ला केला.

दोन्ही आरोपी पोलीस घोघाडिहा पोलीस ठाण्यात तैनात आहेत, ज्यामध्ये गोपाल प्रसाद घोघडिहा हे पोलीस निरीक्षक (स्टेशन हेड) आहेत, तर दुसरा आरोपी अभिमन्यू त्याच पोलीस ठाण्यात एसआय म्हणून कार्यरत आहे. न्यायाधीश यापूर्वीही त्यांच्या निकालामुळे चर्चेत राहिले होते. न्यायाधीश अविनाश कुमार यांनीही आपल्या निकालादरम्यान जिल्ह्यातील पोलिस प्रमुखावर अनेकदा भाष्य केले आहे. तसेच, दोन्ही आरोपींना एका प्रकरणात न्यायालयात हजर राहायचे होते, यादरम्यान दोघेही झांझारपूर न्यायालयात हजर राहण्यासाठी आले असता त्यांनी न्यायाधीशांवर हल्ला केला.

न्यायाधीश अविनाश कुमार हे त्यांच्या वेगवेगळ्या निर्णयांनी चांगलेच चर्चेत असतात. एका प्रकरणात न्यायाधीश अविनाश कुमार यांनी एका धोब्याला गावातील सर्व महिलांचे कपडे धुण्याची शिक्षा सुनावली होती. तर एकदा एका शिक्षकाला पहिली ते पाचवीपर्यंतच्या मुलांना मोफत शिकवण्याचा आदेश दिला होता. तर अलीकडेच त्यांनी मधुबनी येथील पोलीस अधीक्षक डॉ. सत्यप्रकाश यांना कायदा शिकवावा असं पत्र केंद्र सरकारला दिले होते. त्यावरुन दोन पोलीस अधिकाऱ्यांनी न्यायाधीशावरच बंदूक रोखत त्यांना धमकी दिली व हल्ला केला.

या बाबत बार असोसिएशन झांझारपूरचे उपाध्यक्ष म्हणतात की, कोर्टात वादविवाद सुरू असताना न्यायाधीश साहेबांवर दोन पोलिसांकडून ज्या पद्धतीने हल्ला झाला, तो अत्यंत निषेधार्ह आणि न्याय व्यवस्थेला दडपण्याचा प्रयत्न आहे. त्याचबरोबर या संपूर्ण प्रकरणावरून त्यांनी जिल्ह्यातील पोलीस प्रमुखांवरही प्रश्नचिन्ह उपस्थित केले आहे. या संपूर्ण प्रकरणाची न्यायालयीन चौकशी करण्याची मागणी बार असोसिएशनच्या वकिलांनी केली असून, तसे न झाल्यास मोठे आंदोलन करण्याचा इशारा दिला आहे.

काय आहे प्रकरण

काही दिवसांपूर्वी विधिक सेवा समितीच्या समक्ष घोघरडीहा पोलीस ठाण्याच्या हद्दीत भोलीरही गावात राहणाऱ्या महिलेने पोलीस निरीक्षकाविरोधात बनावट गुन्हा नोंद केल्याचं निवेदन दिले होते. ज्यावरुन कोर्टाने बुधवारी घोघरडीहा ठाण्याचे पोलीस निरीक्षकांना समन्स बजावलं. परंतु त्यादिवशी पोलीस अधिकारी कोर्टासमोर हजर झाले नाहीत. गुरुवारी ते पोलीस कोर्टासमोर हजर झाले तेव्हा त्यांनी ADJ अविनाश कुमार यांच्यासोबत वाद घातला. त्यावेळी वाद इतका वाढला की पोलिसांनी थेट न्यायाधीशांवरच बंदूक रोखली.

यावेळी न्यायाधीशांच्या सुरक्षा रक्षकांनी तात्काळ पोलीस कर्मचाऱ्यांना पकडलं. या गोंधळात न्यायाधीशांना किरकोळ दुखापत झाली. तेव्हा न्यायालयात उपस्थित असणाऱ्या काही वकिलांनी आरोपी पोलिसांना बेदम मारलं. त्यानंतर हे प्रकरण दरभंगाचे IG अजिताभ चौधरी, मधुबनी DM अमित कुमार आणि SP डॉ. सत्यप्रकाश यांच्याकडे गेले. पोलिसांनी दोन्ही आरोपींना उपचारासाठी हॉस्पिटलला नेले. या प्रकरणाचं गांभीर्य लक्षात घेऊन मुख्य न्यायाधीशांनी प्रधान सचिव आणि DGP यांना बोलवलं. 29 नोव्हेंबरला सरकार आणि मधुबनी एसपी डॉ. सत्यप्रकाश यांच्याकडे स्पष्टीकरण मागवण्यात आले. 8 तासांच्या हायवॉल्टेज ड्रामानंतर पोलिसांकडून केवळ या प्रकरणाची चौकशी सुरु असल्याचं विधान आले. तपासानंतर कारवाई होईल असं सांगितले.


LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here