नवी दिल्ली, दि.10: कोरोनाव्हायरसच्या (Coronavirus) प्रकरणांमध्ये वाढ होत असताना केंद्र सरकारने (Central Government) सोमवारी सांगितले की, सध्या फक्त 5 ते 10 टक्के सक्रिय प्रकरणांमध्ये रूग्णांना रुग्णालयात दाखल करण्याची आवश्यकता आहे. मात्र, परिस्थिती झपाट्याने बदलू शकते, असा इशारा सरकारने दिला. केंद्राने राज्यांना पत्र लिहून म्हटले आहे की, “दुसऱ्या लाटेत, 20-23% सक्रिय रूग्णांना रुग्णालयात दाखल करण्याची आवश्यकता होती, त्या तुलनेत सध्या, फक्त 5-10% सक्रिय रूग्णांना रुग्णालयात दाखल करण्याची आवश्यकता आहे. तरीही सावध असणे आवश्यक आहे.” (The central government warned the states against the backdrop of the third wave of corona)
सरकारने सांगितले की, या क्षणी परिस्थितीबद्दल काहीही ठोस सांगता येणार नाही. येत्या काळात परिस्थिती बदलू शकते. रुग्णालयात दाखल होणाऱ्यांची संख्या अचानक वाढू शकते.
केंद्राने राज्यांना एकूण सक्रिय रुग्णांची संख्या, रुग्णालयात दाखल रुग्णांची संख्या, होम आयसोलेशनमधील रुग्णांची संख्या, ऑक्सिजन बेड, आयसीयू बेड आणि व्हेंटिलेटर सपोर्ट स्थिती यावर दररोज लक्ष ठेवण्यास सांगितले. देशातील कोरोनाची वाढती प्रकरणे पाहता सरकारने राज्यांना सूचना जारी केली आहे.
केंद्राने राज्यांना आरोग्य सुविधांद्वारे आकारले जाणारे पैसे न्याय्य आहेत याची खात्री करण्यास सांगितले. जास्त चार्जिंगच्या बाबतीत देखरेख आणि कारवाईसाठी यंत्रणा तयार करण्याच्या सूचना दिल्या आहेत. कोविड केअर सेंटर (CCC) मधील बेड्स ऑक्सिजन समर्पित बेडमध्ये आणि आवश्यकतेनुसार अपग्रेड करण्याच्याही सूचना दिल्या आहेत.
टेलि-कन्सल्टेशन सेवांच्या तरतुदीसाठी सेवानिवृत्त वैद्यकीय व्यावसायिक किंवा एमबीबीएस विद्यार्थ्यांची नियुक्ती करावी. आरोग्य मंत्रालयाने 8 जानेवारी आणि 9 जानेवारी, 2022 ला सर्व राज्यांना एमबीबीएस अंतिम वर्षाचे विद्यार्थी, इंटर्न, सीनिअर रेसिडेंट्स, ज्युनिअर रेसिडेंट्ससोबत बीएससी नर्सिंगच्या विद्यार्थ्यांच्या सेवांचा उपयोग करण्याबाबत दोन स्वतंत्र मार्गदर्शक तत्त्वे जारी केली आहेत.
गरज भासल्यास कोविड लसीकरण केंद्रे रात्री 10 वाजेपर्यंत सुरू ठेवता येतील. कोविड लसीकरण केंद्रांची (CVCs) वेळ निश्चित केलेली नाही. गरजेनुसार त्यांचा वेळ वाढवला जाऊ शकतो. पायाभूत सुविधा असल्यास कोविड लसीकरण केंद्रे रात्री 10 वाजेपर्यंत सुरू करता येतील, असे केंद्रीय आरोग्य मंत्रालयाने राज्यांना पत्र लिहून सांगितले आहे.