Covid Third Wave: केंद्र सरकारने देशातील कोरोनाच्या वाढत्या रुग्णसंख्येवर व्यक्त केली चिंता

0

नवी दिल्ली,दि.२०: भारतात कोरोनाच्या तिसऱ्या लाटेत रूग्ण संख्या (Corona Cases In India) वाढत आहे. देशातील अनेक राज्यात रुग्ण संख्येत मोठी वाढ झाली आहे. केंद्र सरकारने आज दिल्लीत पत्रकार परिषद घेत देशातील करोनाच्या सद्यस्थितीची माहिती दिली. देशात गेल्या २४ तासांत करोनाचे ३ लाखांवर नवीन रुग्ण आढळून आले आहेत. या पार्श्वभूमीवर केंद्र सरकारने चिंता व्यक्त केली आहे. खासकरून महाराष्ट्राची चिंता वाढवणारी ही बातमी आहे. महाराष्ट्र, कर्नाटक, तामिळनाडू, केरळ, दिल्ली आणि उत्तर प्रदेश ही ‘चिंता वाढवणारी राज्ये’ आहेत. आम्ही या राज्यांमध्ये केंद्रीय आरोग्य पथके पाठवली आहेत आणि परिस्थितीचा सतत आढावा घेत आहोत, अशी माहिती केंद्रीय आरोग्य मंत्रालयाचे सचिव राजेश भूषण यांनी दिली आहे.

आशियाई देशांमध्ये ४ आठवड्यांत कोरोनाच्या रुग्णांची संख्या प्रचंड वेगाने वाढत आहे. भारतातही कोरोनाच्या रुग्णसंख्येत मोठी उसळी दिसून येत आहे. देशात सर्वाधिक रुग्ण हे १० राज्यांमध्ये त्यात महाराष्ट्र टॉपवर आहे. महाराष्ट्र, कर्नाटक, तामिळनाडू, केरळ, पश्चिम बंगाल, उत्तर प्रदेश, गुजरात, ओडिशा, दिल्ली आणि राजस्थान ही राज्ये टॉप टेनमध्ये आहेत. कारण या राज्यांमध्ये कोरोनाचे सर्वाधिक ॲक्टिव्ह रुग्ण आहेत, असे राजेश भूषण म्हणाले.

देशात देण्यात येत असलेल्या कोरोनावरील लशी या प्रभावी आहेत. लसीकरणामुळे कोरोना मृत्युंचे प्रमाण लक्षणीयरित्या कमी झाले आहे. कोरोनाच्या या तिसऱ्या लाटेत गंभीर रुग्णांची संख्या आणि मृत्युही मोठा प्रमाणात कमी झाले आहेत, अशी माहिती आयसीएमआरचे महासंचालक बलराम भार्गव यांनी दिली. देशात कोरोनाच्या दुसऱ्या लाटेत ३० एप्रिल २०२१ मध्ये ३ लाख ८६ हजार ४५२ नवीन रुग्ण आढळून आले होते. तर ३, ०५९ जणांचा मृत्यू झाला होता. त्यावेळी करोनाचे ३१ लाख ॲक्टिव्ह रुग्ण होते, असे राजेश भूषण यांनी सांगितले.


LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here