दि.15: Booster Dose: कोरोनाच्या रुग्ण संख्येत पुन्हा एकदा वाढ होत आहे. कोरोना लस (Vaccine) घेणे अत्यंत आवश्यक आहे. केंद्र सरकारकडून आजपासून ‘कोविड लस अमृत महोत्सव’ अंतर्गत पुढचे 75 दिवस बूस्टर डोस (Booster Dose) मोफत दिला जाणार आहे. सगळ्या महानगरपालिका आणि शासकीय लसीकरण केंद्रांवर 30 सप्टेंबरपर्यंत मोफत डोस मिळणार आहे. 18 वर्षांवरील सर्व नागरिकांना बूस्टर डोस घेता येणार आहे. देशाला स्वातंत्र्य मिळून 75 वर्ष पूर्ण झाली असून याच निमित्तानं देशात 75 दिवसांसाठी ‘कोविड लस अमृत महोत्सव’ राबवण्यात येणार आहे. जास्तीत जास्त लोकांनी बूस्टर डोस घ्यावा, हाच त्यामागील मुख्य हेतू आहे.
तुम्ही लसीचे दोन डोस घेतले असतील आणि ते घेऊन जर सहा महिन्यांचा कालावधी उलटून गेला असेल, तर केंद्र सरकारच्या निकषांनुसार तुम्ही कोरोना लसीचा बूस्टर डोस घेण्यास पात्र आहात. कोणत्याही महानगरपालिका आणि शासकीय लसीकरण केंद्रांवर जाऊन तुम्ही कोरोना प्रतिबंधक लसीचा बूस्टर डोस घेऊ शकता. पण अद्यापही अनेक लोकांच्या मनात कोरोना (Covid-19) लसीच्या बूस्टर डोसबाबत संभ्रम आहे. कोरोना लसीच्या बूस्टर डोसबाबत लोकांच्या मनात अनेक प्रश्न आहेत. पण कोरोनापासून बचाव करण्यासाठी बूस्टर डोस घेणं अत्यंत महत्त्वाचं आहे.
18 वर्षांपेक्षा जास्त वयाची आणि कोरोना लसीचे दोन डोस पूर्ण केलेली कोणतीही व्यक्ती बूस्टर डोस घेऊ शकते. याआधी बूस्टर डोस फक्त वयोवृद्धांसाठी आवश्यक असल्याचं सांगितलं जात होतं. मात्र यावर्षी एप्रिलमध्ये सरकारनं मोठा निर्णय घेत बूस्टर डोस 18 वर्षांवरील सर्वांना बूस्टर डोस घेता येणार असल्याचं जाहीर केलं. 18 वर्षांपेक्षा जास्त वय असलेल्यांसाठी बूस्टर डोसचा पर्यायही खुला करण्यात आला आहे.
दुसरा डोस आणि बूस्टर डोसमधील अंतर किती?
आरोग्य मंत्रालयां कोरोनाचा दुसरा डोस आणि बुस्टर डोस यांच्यातील अंतर 9 महिन्यांवरुन 6 महिन्यांवर आणलं आहे. जास्तीत जास्त लोकांनी बुस्टर डोस घ्यावा, या हेतूनं हे अंतर कमी करण्यात आलं आहे. यासोबतच केंद्र सरकारनं प्रत्येक व्यक्तीचं लसीकरण करण्यासाठी 1 जूनपासून ‘हर घर दस्तक’ मोहीम 2.0 सुरु केली आहे. इंडियन कौन्सिल ऑफ मेडिकल रिसर्च आणि आंतरराष्ट्रीय संशोधन संस्थांच्या अभ्यासानुसार, कोरोनाच्या पहिल्या दोन डोसचा प्रभाव फक्त 6 महिने टिकतो. यानंतर व्यक्तीच्या शरीरातील अँटीबॉडीची पातळी कमी होते. अशा परिस्थितीत बूस्टर डोस घेणं आवश्यक आहे जेणेकरून रोगप्रतिकारक शक्ती मजबूत होईल.