“मराठा समाजाचे अस्तित्वच मिटवायला जरांगे पाटील लागले आहे” तेजस्विनी चव्हाण

0

सातारा,दि.१६: राज्यभरात मराठा आरक्षणाचे नेतृत्व उभारणारे मनोज जरांगे पाटील सध्या महाराष्ट्र दौऱ्यावर आहेत. या दौऱ्यात जरांगे पाटील ठिकठिकाणी सभा घेणार आहेत. परंतु सातारा येथील जरांगेच्या सभेवरून वाद निर्माण झाले आहे. साताऱ्यातील शिवतीर्थ इथं मनोज जरांगे पाटलांची सभा होणार असल्याचे बोलले जाते. परंतु याठिकाणी जरांगे पाटलांनी साताऱ्यात अन्यत्र सभा घ्यावी परंतु शिवतीर्थ इथं सभा घेऊ नये असं मराठा आंदोलक तेजस्विनी चव्हाण यांनी म्हटलं आहे.

मराठा समाजाचे अस्तित्वच मिटवायला जरांगे पाटील…

तेजस्विनी चव्हाण म्हणाल्या की, शिवतीर्थ इथं सभा घेण्याचा नवीन पायंडा पाडू नका, तुम्ही एवढं मोठा गड जिंकलेला नाही. मराठा समाजाचे अस्तित्वच मिटवायला जरांगे पाटील लागले आहे. मराठा हा कुणबी नाही. मराठा समाजाला तुम्ही भडकवत आहात. मराठा समाज शेतकरी आहे असं बोलता, परंतु शेतकरी हे सर्व जातीत आहेत. विनाकारण मराठा समाजाचा बाणा, ९६ कुळी मराठ्यांचे अस्तित्व नष्ट करून तुम्ही ओबीसीमध्ये ज्या जाती आहेत त्या सर्वांना तुम्ही रोडवर आणण्याचा प्रयत्न करताय असा आरोप त्यांनी केला.

त्याचसोबत आज सगळ्या समाजातील लोक रस्त्यावर आले तर आरक्षण मिळणार कुणाला? मराठा हा समाज आहे, कुणबी ही जात आहे. पश्चिम महाराष्ट्रात १०० पैकी केवळ ५ टक्के कुणबी नोंदी आढळल्या आहेत. त्यामुळे विनाकारण ९५ टक्के मराठा समाजाला कुणबी बनवण्याचा जरांगेंनी प्रयत्न करू नये. ओबीसीत आम्हाला आरक्षण नको, ते आमचेच बांधव आहे. मराठा समाज हा मोठ्या भावाप्रमाणे वागत आला आहे. अजूनही वेळ गेली नाही, मराठा समाजासाठी लढा, कायद्याने लढा, बेकायदेशीरपणे कुणबी प्रमाणपत्रे घेतली तर कोर्टात ते टिकणार नाही. जर आरक्षणाचा मुद्दा त्याच टप्प्यावर येऊन थांबणार असेल तर सरकारकडे काय मागितले पाहिजे हे ठरवा असं तेजस्विनी चव्हाण यांनी म्हटलं आहे.

दरम्यान, सरसकट कुणबी प्रमाणपत्रे द्या ही भूमिकाच चुकीची आहे. जो माणूस आजपर्यंत गेल्या २ महिन्यात सात वेळा विधाने बदलतो, तो समाजासाठी योग्य नाही. जरांगे पाटील यांनी कुणबी म्हणजे मराठा आहे, त्यामुळे समाजाची दिशाभूल झाली आहे. जो ९६ कुळी मराठा आहे त्या समाजाने काय करायचे, मराठ्यांनी कुणबी व्हावं हे तुम्ही सभेत सांगणार का? आम्हाला कुणबी व्हायचे नाही. त्यामुळे तुम्हाला यायचे असेल या, परंतु शिवतीर्थ इथं सभा होऊ देणार नाही, जर कुणी परवानगी दिली तर त्याठिकाणी मी आमरण उपोषणाला बसणार आहे असंही तेजस्विनी चव्हाण यांनी इशारा दिला.


LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here