आता अन्यायाचा बदला घ्या, भाजपाला चारीमुंड्या चित करा: धर्मराज काडादी

0

सोलापूर,दि.13: शेतकरी आणि कामगारांसाठी मंदिरासमान असलेल्या सिध्देश्वर सहकारी साखर कारखान्याची चिमणी पाडून प्रत्यक्ष आणि अप्रत्यक्ष अशा हजारो लोकांचे संसार उद्ध्वस्त केलेल्या भाजपला चारीमुंड्या चित करून सभासद शेतकरी, कामगारांनी आपल्यावर झालेल्या अन्यायाचा बदला घ्यावा आणि काँग्रेसच्या उमेदवार प्रणिती शिंदे यांच्या पाठीशी खंबीरपणे उभे राहावे, असे आवाहन श्री सिध्देश्वर सहकारी साखर कारखान्याचे मार्गदर्शक संचालक धर्मराज काडादी यांनी केले.

शुक्रवारी, हॉटेल प्रथम येथील सभागृहात सोलापूर लोकसभा मतदारसंघातील निवडणुकीच्या अनुषंगाने पार पडलेल्या श्री सिध्देश्वर परिवारातील वीरशैव लिंगायत समाजाच्या प्रमुख मान्यवरांच्या बैठकीत काडादी यांनी आपली भूमिका स्पष्ट केली. या बैठकीस माजी केंद्रीय गृहमंत्री सुशीलकुमार शिंदे, माजी मंत्री सिध्दाराम म्हेत्रे, माजी आमदार विश्वनाथ चाकोते, कारखान्याचे उपाध्यक्ष सिध्दाराम चाकोते, कारखान्याचे संचालक तथा शिवसेना ठाकरे गटाचे जिल्हाप्रमुख अमर पाटील, अ‍ॅड. शिवशंकर बिराजदार, जागतिक लिंगायत महासभेचे कार्याध्यक्ष विजयकुमार हत्तुरे, सोलापूर कृषी उत्पन्न बाजार समितीचे संचालक केदार उंबरजे, अशोक पाटील, मल्लिकार्जुन पाटील, रामदास फताटे, महेश बँकेचे अध्यक्ष अनिल सिंदगी, काँग्रेसचे दक्षिण तालुकाध्यक्ष हरीश पाटील, उदयशंकर चाकोते, काँग्रेस यंग ब्रिगेडचे प्रदेशाध्यक्ष सुदीप चाकोते, रमेश बावी, पशुपती माशाळ, सकलेश बाभळगावकर, सिध्देश्वर साखर कारखाना कामगार युनियनचे अध्यक्ष अशोक बिराजदार, राजशेखर म्हमाणे यांच्यासह सिध्देश्वर साखर कारखाना, सिध्देश्वर देवस्थान, सिध्देश्वर शिक्षण संस्था, सिध्देश्वर बाजार समितीतील पदाधिकार्‍यांसह लिंगायत समाजातील मान्यवर मोठ्या संख्येने उपस्थित होते.

प्रारंभी काँग्रेसचे वरिष्ठ उपाध्यक्ष सुरेश हसापुरे यांनी प्रास्ताविक केले. काडादी पुढे म्हणाले, आमदार प्रणिती शिंदे यांच्या अंगात धमक आहे. चिमणी पाडल्यानंतर लगेच साखर कारखाना स्थळावर येऊन त्यांनी पाहणी केली. सर्व कामगारांना धीर दिला. प्रणिती शिंदे यांनी विधान सभेतसुध्दा कारखान्याच्या चिमणीचा विषय वेळोवेळी मांडून सरकारला धारेवर धरले होते. माजी केंद्रीय गृहमंत्री सुशीलकुमार शिंदे यांनीही सिध्देश्वर यात्रेच्यावेळी होम मैदानावरील रस्त्याविषयी निर्माण झालेल्या प्रश्नाबद्दल स्वतः मंत्रालयात येऊन मुख्यमंत्र्यांसमवेत बैठक घेऊन हा विषय मार्गी लावला होता, याची आठवण काडादी यांनी यावेळी करून दिली.

सभासदांची बैठक घेणार

आता आपण श्री सिध्देश्वर साखर कारखान्याचे सभासद असलेल्या दक्षिण सोलापूर, अक्कलकोट, उत्तर सोलापूर, मोहोळ या तालुक्यांमध्ये स्वतः लक्ष घालून सर्व सभासदांची एक बैठक कारखान्याच्या मंगल कार्यालयात घेणार आहोत. त्या बैठकीत आपण भाजपला चारीमुंड्या चित करून प्रणिती शिंदे यांच्या पाठीशी उभे राहण्याचे आवाहन करणार असल्याचेही काडादी यांनी सांगितले.

यावेळी राष्ट्रवादी शरद पवार गटाचे प्रदेश सरचिटणीस शंकर पाटील, दक्षिण सोलापूर तालुकाध्यक्ष बिपीन करजोळे, शिवयोगीशास्त्री होळीमठ, विजय शाबादी यांनीही मनोगत व्यक्त करून प्रणिती शिंदेंच्या पाठीशी खंबीरपणे उभे राहण्याचे आवाहन केले.

पवारसाहेबांची मोठी मदत

साखर कारखान्याच्या चिमणीच्या संदर्भात राष्ट्रवादी काँग्रेसचे सर्वेसर्वा शरद पवार यांनी सातत्याने मदत केली होती. चिमणी पाडल्यानंतरही त्यांनी सोलापुरात झालेल्या एका समारंभात आपणास जाहीर पाठिंबा देऊन आपल्या पाठीशी खंबीरपणे उभे राहणार असल्याचे सांगितले. चिमणी पाडल्यानंतर पवारसाहेबांनी तातडीने वसंतदादा शुगर इन्स्टिट्यूटमधील तज्ज्ञांची कमिटी पाठवून दिली होती आणि यंदाचा गाळप हंगाम चालू करण्यास खूप मोठे सहकार्य केले होते. त्यांचे ॠण मानणे मी माझे कर्तव्य समजतो.

काडादींचा उघड पाठिंबा; सुशीलकुमारांकडून आभार

आमदार प्रणिती जिद्दी आणि धडपडी आहे. ती जात-पात न पाहता सर्वांचीच कामे करते. लोकसभा निवडणुकीत तिला सर्वत्र चांगला पाठिंबा मिळत आहे. आपणही तिला साथ द्या, असे आवाहन करीत माजी केंद्रीय गृहमंत्री सुशीलकुमार शिंदे यांनी श्री सिध्देश्वर सहकारी साखर कारखान्याचे मार्गदर्शक संचालक धर्मराज काडादी यांनी मोठ्या धाडसाने उघड बैठक घेऊन आमदार प्रणिती शिंदे यांना पाठिंबा दिल्याबद्दल आभार व्यक्त केले.


LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here