Home आरोग्य स्वाइन फ्लूचा नवा स्ट्रेन? ICMR चा मोठा खुलासा; ‘या’ कारणांमुळे वाढतेय रुग्णसंख्या

स्वाइन फ्लूचा नवा स्ट्रेन? ICMR चा मोठा खुलासा; ‘या’ कारणांमुळे वाढतेय रुग्णसंख्या

0

नवी दिल्ली,दि.२४: दिल्लीसह देशातील विविध भागांत स्वाइन फ्लूच्या (H1N1) रुग्णांमध्ये होणारी वाढ चिंताजनक मानली जात असतानाच ‘इंडियन काऊन्सिल ऑफ मेडिकल रिसर्च’ (ICMR) ने यावर महत्त्वाचा खुलासा केला आहे. देशात स्वाइन फ्लूचा कोणताही नवा किंवा अत्यंत धोकादायक स्ट्रेन आढळलेला नाही. सध्या पसरणारा संसर्ग हा नेहमीच्या ‘सीजनल इन्फ्लुएंझा’चाच एक भाग आहे. त्यामुळे नागरिकांनी घाबरून न जाता केवळ खबरदारी बाळगावी, असे आवाहन तज्ज्ञांनी केले आहे.

हा नवा स्ट्रेन नाही: ICMR

ICMR च्या शास्त्रज्ञांनुसार, सध्या आढळणारा H1N1 व्हायरस २०२५ पासूनच सर्क्युलेशनमध्ये आहे. यामध्ये असा कोणताही नवीन जनुकीय बदल (Mutation) झालेला नाही, ज्यामुळे हा व्हायरस आधीपेक्षा जास्त शक्तिशाली किंवा घातक बनेल. आरोग्य यंत्रणांना रुग्णांची तात्काळ तपासणी, निरीक्षण आणि वेळेवर उपचार करण्याचे निर्देश देण्यात आले आहेत.

रुग्णसंख्या अचानक का वाढतेय?

एम्स (AIIMS) मधील मेडिसिन विभागाचे प्रोफेसर डॉ. नीरज निश्चल यांच्या मते रुग्णवाढीमागे खालील प्रमुख कारणे आहेत:

बदलते हवामान: सततचे चढ-उतार, पाऊस आणि दमट वातावरण यामुळे व्हायरस अधिक सक्रिय होतो.

 बंद खोल्या आणि AC ची हवा: हवामानातील बदलांमुळे लोक बंद खोल्यांमध्ये जास्त वेळ घालवतात. AC चा सततचा वापर आणि खेळत्या हवेचा अभाव यामुळे संसर्ग एका व्यक्तीकडून दुसऱ्याकडे वेगाने पसरतो.

 कमी प्रतिकारशक्ती आणि वाढत्या चाचण्या: समाजात पुरेशी प्रतिकारशक्ती नसलेले लोक असणे आणि लक्षणे दिसताच लोकांनी चाचण्यांचे प्रमाण वाढवणे, यामुळेही नोंद होणाऱ्या रुग्णांचा आकडा जास्त दिसत आहे.

‘हाय-रिस्क’ ग्रुपने विशेष काळजी घ्यावी

बहुतेक लोकांमध्ये हा फ्लू सामान्य उपचारांनी किंवा आपोआप बरा होतो. मात्र, खालील घटकांसाठी हा संसर्ग गंभीर रूप धारण करू शकतो:

 लहान मुले आणि ज्येष्ठ नागरिक

 गरोदर महिला

 मधुमेह, उच्च रक्तदाब किंवा फुफ्फुसाचे आजार असलेले रुग्ण

बचावासाठी काय करावे?

साबणाने किंवा सॅनिटायझरने हात वारंवार स्वच्छ धुवावेत.

गर्दीच्या आणि बंद हवेच्या ठिकाणी मास्कचा वापर करावा.

 फ्लूची लक्षणे दिसल्यास अंगावर न काढता तात्काळ डॉक्टरांचा सल्ला घ्यावा.


LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

कॉपी करू नका.