Vinod Thomas: प्रसिद्ध अभिनेते विनोद थॉमस यांचा संशयास्पद मृत्यू

0

मुंबई,दि.19: Vinod Thomas: चित्रपटसृष्टीतून एक वाईट बातमी येत आहे. साऊथ इंडस्ट्रीतील प्रसिद्ध अभिनेते विनोद थॉमस यांचे निधन झालं. वयाच्या अवघ्या 45 व्या वर्षी या अभिनेत्यानं अखेरचा श्वास घेतला आहे. हॉटेलच्या पार्किंग एरियात उभ्या असलेल्या कारमध्ये त्यांचा मृतदेह आढळल्याने खळबळ उडाली आहे. माहिती मिळताच पोलीस घटनास्थळी पोहोचले आणि मृतदेह शवविच्छेदनासाठी पाठवण्यात आला. अभिनेत्याच्या मृत्यूचे कारण अद्याप समोर आलेले नाही.

मिळालेल्या माहितीनुसार, मल्याळम अभिनेता विनोद थॉमस केरळमधील कोट्टायम येथील पंपाडीजवळ एका हॉटेलमध्ये पार्क केलेल्या कारमध्ये मृतावस्थेत आढळून आला. पोलिसांनी सांगितले की, 45 वर्षीय अभिनेत्याच्या मृत्यूची माहिती हॉटेल व्यवस्थापनाला मिळाली. एक व्यक्ती त्यांच्या पार्किंग एरियात उभ्या असलेल्या कारमध्ये बराच वेळ आहे’ अशी माहिती पोलिसांना मिळताच ते घटनास्थळी दाखल झाले. पण तोपर्यंत या अभिनेत्याचा मृत्यू झालेला होता.

पोलिसांनी सांगितले की, ‘आम्ही त्याला कारमधून काढले आणि त्याला जवळच्या रुग्णालयात नेले. डॉक्टरांनी त्यांना तपासून मृत घोषित केले.’ अभिनेत्याच्या मृत्यूचे कारण शोधण्यासाठी मृतदेह पोस्टमॉर्टमसाठी पाठवण्यात आल्याचे सांगण्यात आलं आहे.

मीडिया रिपोर्ट्सनुसार, विनोद थॉमसच्या मृत्यूचे कारण कारच्या एसीमधून विषारी वायू श्वासात घेतल्याचा संशय आहे. शवविच्छेदनानंतरच याची पुष्टी होईल, असंही पोलिसांनी सांगितले.

थॉमस यांनी आजवर ‘अयप्पनम कोस्युम’, ‘नाथोली ओरू चेरिया मीनाल्ला’, ‘ओरू मुराई वनथा पथाया’, ‘हॅपी वेडिंग’ आणि ‘जून’ यांसारख्या चित्रपटांमधील दमदार अभिनयासाठी ओळखले जातात. त्यांच्या निधनाने चित्रपटसृष्टीत हळहळ व्यक्त केली जात आहे.


LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here