सोलापूर,दि.२५: माजी केंद्रीय गृहमंत्री सुशीलकुमार शिंदे यांनी सोलापूर लोकसभा मतदारसंघातून काँग्रेसचा उमेदवार कोण असेल यावर भाष्य केले आहे. सोलापूर लोकसभा मतदारसंघातून आमदार प्रणिती शिंदे याच निवडणूक लढवतील, असे काँग्रेसचे ज्येष्ठ नेते सुशीलकुमार शिंदे यांनी सांगितले. मंगळवारी, धम्मचक्र प्रवर्तनदिनाच्या निमित्ताने शिंदे यांनी डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या पुतळ्यास पुष्पहार अर्पण करून अभिवादन केले.
यावेळी पत्रकारांनी सोलापूर लोकसभा मातदारसंघातून कोण निवडणूक लढविणार असा प्रश्न उपस्थित केल्यानंतर शिंदे यांनी किती वेळा सांगू असा उलट प्रश्न करीत प्रणिती याच या मतदारसंघातून निवडणूक लढविणार असल्याचे सांगितले.
आता मी राजकारणातून निवृत्त झालोय, प्रणिती शिंदे याच उमेदवार राहतील त्यासाठी माझ्याकडून जितका प्रयत्न होईल तितका मी फिरतोय असे यावेळी शिंदे यांनी सांगितले.
यावेळी सोलापूर शहराध्यक्ष चेतन नरोटे, माजी महापौर सुशीला आबुटे, मागासवर्गीय सेलचे जिल्हाध्यक्ष ॲड. गौरव खरात, मागासवर्गीय सेलचे शहराध्यक्ष उमेश सुरते, बाबा मिस्त्री, विनोद भोसले, प्रवीण निकाळजे, गणेश डोंगरे, प्रमिला तूपलवंडे, बाबा करगुळे, वैष्णवी करगुळे, मधुकर आठवले आदी उपस्थित होते.